औरंगाबाद : डिसेंबरमध्ये झालेल्या सहायक प्राध्यापक राज्य पात्रता चाचणीमध्ये (सेट) यंदा पात्रता होण्यासाठीच्या टक्केवारीमध्ये (कटऑफ) पाॅईंट ३ ते ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागील आठ-नऊ वर्षांनंतर प्राध्यापकांची मोठी भरती झाली नाही. प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे ‘सेट-नेट’ देण्याबाबत निरुत्साह असल्याचे यामागचे कारण असावे, असे पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये बोलले जात आहे.
२७ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणीचा (सेट) निकाल बुधवारी रात्री उशिरा घोषित झाला. यामध्ये विविध ३२ विषयांसाठी परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वच विषयांत कट ऑफ पाॅईंटमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी दोन्ही राज्यांतील ६१ हजार ११४ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४ हजार ११४ विद्यार्थी पात्र ठरले असून ६.७३ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा जून २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ही परीक्षा ६ महिने लांबणीवर पडली व ती २७ डिसेंबर रोजी घेण्यात आली. या परीक्षेत पात्रता होण्यासाठी विषयनिहाय टक्केवारी अशी : मराठी (४८.६७), हिंदी (५३.३३), इतिहास (४९.३३), संगणकशास्त्र (४९.३३), तत्त्वज्ञान (५३.३३), मानसशास्त्र (५४), समाजशास्त्र (५२), वृत्तपत्र विद्या अभ्यास व लोकसंवाद (५४.६७), शिक्षणशास्त्र (५३.३३) या विषयांचा कटऑफ पाॅईंट पहिल्यांदाच खाली आहे.
राज्य आयोगाप्रमाणेच सेटमध्येही अनियमितताराज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे ‘सेट’मध्येही परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत अनियमितता होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) ही नियमितपणे घेतली जात असताना, राज्य पात्रता चाचणी (सेट) घेतली जात नाही. गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षात ही परीक्षा एकदाच झाली आहे. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जावी, असे ‘युजीसी’चे निर्देश आहेत. मात्र, महाराष्ट्रात २८ जानेवारी २०१८, २३ जून २०१९ आणि २७ डिसेंबर २०२० रोजी ही परीक्षा झाली. या वर्षातही एकच परीक्षा होण्याची शक्यता आहे. नेट ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केल्यापासून ही परीक्षा व्यवस्थित पार पडत आहे. नेटप्रमाणे सेटची ऑनलाईन परीक्षा होत नाही. कोविडच्या काळात तरी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.