औरंगाबाद : अरुंद गल्लीमध्ये ट्रक आणि छोटा हत्ती वाहन उभे करून रहिवाशांचा मार्ग अडविल्यावरून झालेल्या भांडणात तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जखमी केल्याच्या घटनेत सिटीचौक पोलिसांनी भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे. मुख्य आरोपी वाहनचालक घटनेपासून फरार असून, त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत पोलीस घेत होते. शेख महेमूद शेख अहेमद जमील ऊर्फ राजाभाई (रा. बुढ्ढीलेन ) असे अटकेतील व्यापाऱ्याचे नाव आहे.
अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (वय २४,रा. बुढ्ढीलेन) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.
बुढीलेनजवळील नई बस्तीमध्ये आरोपी राजाभाई याचे भंगार दुकान आहे. अरुंद गल्लीतील या दुकानात ग्राहकांकडून खरेदी केलेला भंगार माल आठ ते दहा दिवसानंतर तो ट्रक, टेम्पो आणि छोटा हत्ती अशा वाहनाने विक्रीसाठी घेऊन जातो. या वाहनामुळे गल्लीतील रहिवाशांचा रस्ता बंद होतो. गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपासून राजाभाईच्या भंगार गोदामाचा माल भरणाऱ्या दोन वाहनांमुळे रस्ता अडवला गेला होता. त्याचवेळी जखमी तरुणाचा भाऊ अब्दुल रज्जाक मोटारसायकलवरून घरी जात असताना दुचाकीला रस्ता नसल्याने त्यांनी राजाभाईला जाब विचारला असता त्याने रज्जाकला शिवीगाळ केली. याचवेळी त्याच्या वाहनचालक अक्रम याने रज्जाकवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. मात्र ही गोळी रज्जाकने चुकविल्याने तो बालंबाल बचावला.
यानंतर राजाभाईच्या सांगण्यावरून अक्रम तेथून दूर गेला. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास राजाभाईच्या दुकानासमोर लोकांची गर्दी जमल्याचे पाहून जब्बार तेथे गेला तेव्हा त्याला हा प्रकार समजला. जब्बारने याविषयी राजाभाईला जाब विचारल्याने त्यानेही त्याच्यासोबत भांडण सुरू केले. याचवेळी अक्रम तेथे आला आणि हातातील गावठी कट्ट्यातून त्याने दोन गोळ्या जब्बारच्या दिशेने झाडल्या. यातील एक गोळी चुकविण्यात जब्बारला यश आले मात्र दुसरी गोळी त्याच्या मांडीत लागली. गंभीर जखमी होऊन तो खाली पडताच आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. जखमी जब्बारला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. आरोपी राजाभाई भंगरवालाला पोलिसांनी अटक केली. फरार अक्रमचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे हे करीत आहेत.