रऊफ शेख
फुलंब्री : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होऊन दीड महिना लोटला. या काळात जिल्ह्यातील ७६२ शाळा सुरू झाल्या असून आतापर्यंत ३४ टक्केच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी नियमांचे पालन करत असल्याचे चित्र आहे.
देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू असताना त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १६ मार्चपासून शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. सलग ८ महिने शाळा बंद होत्या. यानंतर २३ नोव्हेंबरला ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने सर्व नियमांचे पालन करून मान्यता दिली. शिक्षकांची कोरोना तपासणी करून शाळा सुरू झाल्या होत्या. प्रारंभी दहा ते बारा टक्केच विद्यार्थी येत होते. मात्र, आता शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या प्रत्येक शाळेत कोरोनासंदर्भात शासनाने जारी केलेल्या नियमवलीचे पालन केले जात आहे. शाळेच्या गेटवरच विद्यार्थ्यांची स्कॅनिंग, मास्क लावणे, तसेच सेनिटायझरचा वापर केला जात असून वर्गात सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थी बसविले जात असल्याचे चित्र आहे.
------- पालकांची उदासीनता --------
ग्रामीण भागात शाळा सुरू होऊन दीड महिना झाला. या काळात आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यात पालकांची उदासीनता दिसून येत असून मुख्य कारण कोरोनाचे आहे; पण या काळात शाळेतील एकही विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळून आला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. त्यामुळे पालकांनी याचा विचार करून मुलांना शाळेत पाठविण्यात सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती काही दिवसांत पूर्वपदावर येईल, अशी अशा जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी व्यक्त केली.
------- कोट --------
अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याच्या तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा आजच जाहीर झाल्या. १५ एप्रिलनंतर बारावीच्या, तर दहावीच्या १ मेनंतर परीक्षा होणार आहेत. ग्रामीण भागात ज्यांच्याकडे सुविधा नव्हत्या, अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. अशा मुलांचे नुकसान भरून काढणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळा नियमित सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी
-------- एकूण शाळा ७९७
------ सुरू असलेल्या शाळा ७६२
------- एकूण विद्यार्थी १ लाख ८९ हजार ३३१
------- उपस्थिती ६४ हजार ३७२
-------- कार्यरत शिक्षक ३ हजार ८३०
------------ कॅप्शन : फुलंब्रीतील वानखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांना सेनिटायझेशन करून वर्गात सोडताना शिक्षक.