४५ वर्षांखालील लोकांचे काय? : वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील पर्मनंट आणि लर्निंग लायसन्सचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच लस घेतलेली असेल तरच आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. त्याखालील नागरिकांचे काय, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधामुळे आरटीओ कार्यालयातील पर्मनंट, लर्निंग लायसन्सची चाचणी ११ मार्चपासून बंद आहे. या चाचणीला ५ एप्रिलपासून सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; परंतु आता ३० एप्रिलपर्यंत या दोन्ही लायसन्ससाठी चाचणी घेण्यात येणार नाही; पण याविषयी वाहनचालकांना माहितीच नव्हती. त्यामुळे चाचणी देण्यासाठी सोमवारी मोठ्या संख्येने वाहनचालक आले होते. त्यांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठविण्यात आले. या सगळ्यात ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे, अशांनाच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. लस ही ४५ वर्षांवरील लोकांनाच दिली जात आहे. या निर्णयाने वाहनधारक चक्रावून गेले.
‘ब्रेक दी चेन’मध्ये समावेश
सरकारी कार्यालयांत येणाऱ्या अभ्यागतांना लस घेतलेली असेल तर प्रवेश द्यावा, याचा ‘ब्रेक दी चेन’मध्ये समावेश आहे. आरटीओ कार्यालयातील कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर्समध्ये आहेत. त्यामुळे बहुतांश जणांनी लस घेतलेली आहे. ४५ वर्षांखालील लोकांविषयी गाइडलाइन येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.
लस ही ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी
लस ही सर्वांसाठी नाही. लस ही ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी आहे. लस घेतलेली तरच प्रवेश, असा काही निर्णय झालेला नाही, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.
फोटो ओळ..
आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनधारकांना माघारी पाठविण्यात आले.