लोकमत न्यूज नेटवर्कबोरी : तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका व्यापाºयाचे दीड लाख रुपये पळवून नेल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बोरी येथे घडली.येथील सोमाणी कॉलनीतील रहिवासी गणेश शंकरलाल सोमाणी यांचे राम मंदिर रस्त्यावर किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करुन गल्ल्यातील पैसे एका पिशवीत टाकून सोमाणी हे घरी आले. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जेवण करीत असताना तोंडाला रुमाल बांधलेले तीन चोरटे त्यांच्या घरात घुसले. गल्ल्यातील पैसे कुठे ठेवलेस, अशी विचारणा करीत चोरट्यांनी सोमाणी यांच्या गळ्याला चाकू लावला. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी घरात होती. गणेश सोमाणी हे पैसे आणतो म्हणून आतील खोलीत गेले व त्यांनी कपाटातील पैसे काढले. चोरट्यांनी हे सर्व पैसे एका गाठोड्यात टाकून तेथून पळ काढला. या घटनेनंतर सोमाणी यांनी बाहेर येऊन आरडा-ओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थ जमा झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल खेर्डीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक सुनील अवसरमोल, जमादार प्रकाश पंडित घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र पावसामुळे श्वान जागेवरच घुटमळला. याबाबत बोरी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाभरात नाकाबंदी केली. बोरीपासून ते मंठा या गावापर्यंत तपासणी करण्यात आली; परंतु, त्यांना अपयश आले.
धाक दाखवून बोरीत व्यापाºयास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:13 IST