विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यातील लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांची डागडुजी पैशांविना रखडली आहे. आता पावसाळा लागला असून, त्या प्रकल्पांची डागडुजी करणे जमणार नसल्यामुळे ७२ प्रकल्पांतील पाणी वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मान्सूनपूर्व या प्रकल्पांची कामे होणे गरजेचे होते; परंतु शासनाने ६ कोटी ७९ लाख रुपये मागणीच्या प्रस्तावाला ठेंगा दाखविल्याने यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पांची कामे होऊ शकलेली नाहीत. यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्यास या ७२ प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात गळती होण्याची शक्यता आहे.
या कामांचा प्राधान्यक्रम प्रथम होता; परंतु निधीच न मिळाल्याने ही कामे लांबणीवर पडली. शिवाय मान्सूनचे आगमन झाले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील कामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला होता. वैजापूर, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील प्रकल्प दुरुस्तीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी निवेदने दिली; परंतु काहीही हालचाल न झाल्यामुळे प्रकल्पांची दुरुस्ती रखडली आहे.
कार्यकारी अभियंत्यांनी दिला असा प्रस्ताव
उपविभाग क्र.१ औरंगाबादमधील ३ मध्यम आणि १८ लघु प्रकल्पांना १ कोटी ३२ लाखांचा दुरुस्ती खर्च होता. उपविभाग क्र.२ मधील १ मध्यम आणि १२ लघु प्रकल्प दुरुस्तीसाठी १ कोटी ३९ लाख, तर कन्नड उपविभागातील २ मध्यम व १४ लघु प्रकल्पांसाठी १ कोटी ९० लाखांची गरज असल्याचे प्रस्तावात नमूद होते. उपविभाग क्र.४ कन्नडमधील २ मध्यम आणि ४ लघु प्रकल्पांसाठी ८० लाख, तर उपविभाग क्र.५ सिल्लोडमधील ३ मध्यम आणि १४ लघु प्रकल्पांसाठी १ कोटी ६९ लाख, असे ६ कोटी ७९ लाख रुपयांचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम. निंभोरे यांनी शासनाकडे दिला होता. यात ६२ लघु आणि १० मध्यम अशा ७२ प्रकल्पांचा समावेश होता.
काही महत्त्वाचे प्रकल्प असे
वैजापूर तालुक्यातील शिवना टाकळी, देवगाव रंगारी, बोर दहेगाव जोड कालवा, नारंगी-सारंगी, कोली, टेंभापुरी, सटाणा, मन्याड, जरूळ, औरंगाबाद तालुक्यातील सुखना, गोलटगाव, कचनेर, केसापुरी, अंजनडोह, निलजगाव, दावरवाडी, गिरजा, गिरसावळी, गणोरी, आळंद, लोणी, निरगुडी, टाकळी, कन्नड तालुक्यातील पूर्णा नेवपूर, गणेशपूर, वाघदरा, सिरसगाव, रिठी, कुंजखेडा, माटेगाव, डोणगाव, अंबाडी, सातकुंड, गौताळा, अंजना, ढेकू, औराळी, सिल्लोड तालुक्यातील खेळणा, केळगाव, उंडणगाव, अजिंठा-अंधारी, सोयगाव, देव्हारी, जंगलातांडा, वरखेडी, गडदगड, बनोटी, काळदरी, हनुमंतखेडा, अंजना आदी प्रकल्पांचा डागडुजीत समावेश आहे.