अकोला देव : जाफराबाद आगारासह राज्यातील सर्वच आगारांनी खासगी इंधनामधून मिळणारे अनुदान व एस.टी. महामंडळाला डिझेल कंपन्यांकडून मिळणारे अनुदान यामध्ये सारखीच तफावत आल्याने एस.टी. महामंडळाच्या लालपरीची खासगी इंधनामधून पुन्हा सुटका झाली आहे. एसटी बसेस पुन्हा डिझेल भरण्यासाठी स्वगृहातील पंपाचा वापर करीत आहे.एस.टी. महामंडळाला डिझेलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अनुदानीत इंधनावर निर्बंध लावल्याने एसटीला प्रतिलिटर मागे १७ रुपयांचा फटका बसत होता. हा तोटा कमी करण्यासाठी सर्वच आगारप्रमुखांनी खाजगी पंपावरून एसटीसाठी इंधन भरण्याचा करार केला होता. यामधून केवळ जाफराबाद आगाराला ५२ बसेसच्या माध्यमातून रोज हजारो रुपयांचा फायदा होत होता. तब्बल २० महिने आगाराने खासगी पंपावरून इंधन खरेदी केले. यामुळे एसटी महामंडळ एकीकडे नफ्यात आले असे सांगत असले तरी खाजगी पंपावर इंधन भरण्यासाठी एसटी बसेसला रांगा लावाव्या लागत होत्या.त्यामुळे इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ, प्रवाशांना होणारा मनस्ताप बसस्थानक ते पंपावर जाताना लागणारे इंधन यामुळे एसटीला खासगी इंधन खरेदी करणे न परवाडणारे होते. तर दुसरीकडे गत बारा महिन्यात डिझेलची झालेली दरवाढ व २० महिन्यात व्यवस्थापनावर झालेला परिणाम हे सर्व लक्षात धेता राज्यात सर्वात मोठा ग्राहक असलेली एसटी दुरावल्याने डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्या तोट्यात सापडल्याने या कंपन्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कंपनी प्रशासनाने शासनाचे सर्व दडपण झुगारून पुन्हा एकदा एसटीशी आपले सूत जुळून घेतल्याने पुन्हा एसटी महामंडळाला डिझेल पुरवठा सुरू केला असल्याचे ५ सप्टेंबर २०१४ पासून एसटी महामंडळातून डिझेल भरू लागल्याचे जाफराबाद आगार प्रमुख एस.जी. मेहेत्रे, म्हस्के यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘लालपरी’ची खाजगी इंधनामधून पुन्हा सुटका
By admin | Updated: September 19, 2014 00:59 IST