परभणी : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी दिलेल्या पॉर्इंटनुसार २०० फुटापर्यंत नवीन बोअरवेल घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे बोअरवेल लवकरच घेतले जातील, अशी माहिती सभागृहाला देण्यात आली.महापालिकेची स्थायी समितीची सभा १ मार्च रोजी बी.रघुनाथ सभागृहात पार पडली. सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेमध्ये शहरामधील पाणीप्रश्नासंदर्भात चर्चा झाली. त्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लिकेज काढण्यात यावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये टँकरचे पॉर्इंट कमी करण्यासाठी लागणाऱ्या पाईप टाकण्याविषयी चर्चा झाली. प्रभाग १ मध्ये पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पर्यटनस्थळ विकासासाठी मूलभूत सुविधा अनुदान योजनेअंतर्गत सय्यद शाह तुराबूल हक दर्गा येथे टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम, सर्व्हिस एरियाचे बांधकाम, दर्गा परिसरात वृक्षारोपण आदी कामांसाठी निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. ५० लाख रुपये किमतीच्या या प्रशासकीय कामास मान्यता देण्यात आली. मोबाईल टॉयलेट आणि ट्युर्इंग व्हेईकल यांच्या प्रशासकीय मान्यतेच्या रकमेतून टेस्टींग मशीन खरेदी करण्यासही या सभेस मंजुरी देण्यात आली. वाहन उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकल खरेदीसाठी १५ लाख रुपये, मोबाईल टॉयलेट खरेदीसाठी १०.६० लाख रुपये प्रशासकीय मान्यतेनुसार सभागृहात मान्यता द्यावी. दोन्ही कामाच्या रक्कम निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे चार लाख रुपये शिल्लक राहतात. टेस्टींग मशीन खरेदीसाठी ६ लाख ८३ हजार २१९ रुपये एवढ्या रक्कमेची आवश्यकता असून मशीन खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता ३ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ७ लाख ५० हजार रुपये रक्कम होते. त्यातून टेस्टिंग मशीन खरेदी करण्याचा ठराव या सभेत मांडण्यात आला. नगरसेवक उदय देशमुख, मेहराज कुरेशी, रेखाताई कानडे आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
शहरात नवीन बोअर खोदण्यास सभेमध्ये मान्यता
By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST