परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये येणाऱ्या वसाहतीतील गोरगरीब नागरिकांना किरकोळ रॉकेल परवाना धारकांकडून रॉकेल वितरित होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत़ दरम्यान, नगरसेविका शांताबाई लंगोटे यांनी याप्रश्नी तहसीलदारांकडे तक्रार नोंदविली आहे़ तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग १७ मधील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, संजय गांधीनगर, पांडुरंगनगर, डॉ़ आंबेडकरनगर आणि हाजी मोहम्मद साब कॉलनी या भागात राहणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना परवानाधारक रॉकेल विक्रेता योग्यरितीने रॉकेलचे वाटप करीत नाही़ सदर परवानाधारक स्वत: रॉकेल वितरित करण्याऐवजी इतर व्यक्तीमार्फत ते विक्री करतो़ त्यामुळे सूर्योदयापूर्वीच काही विशिष्ट लोकांना ५५ रुपये दराने दोन लिटर रॉकेलची विक्री केली जाते़ या ठिकाणी तब्बल ५० लिटर रॉकेल विक्री होत आहे़ उर्वरित रॉकेल ट्रक, टेम्पो, आॅटो आदी वाहनांसाठी ५० ते ६० रुपये दराने विक्री केले जात आहे़ रेशनकार्डधारकांनी मागणी केल्यास तुम्ही वेळेवर आला नाहीत़, त्यामुळे रॉकेल संपले असे उत्तर दिले जात आहे़ त्यामुळे प्रभाक १७ मधील किरकोळ परवानाधारकांनाच रॉकेल विक्री करण्याची ताकीद द्यावी, ज्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान आहे़ त्याच ठिकाणी रॉकेल वाटप करावे, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर रॉकेल विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, रॉकेल मिळत नसलेल्या रेशन कार्ड धारकांचे लेखी जबाब घेऊन संबंधित परवानाधारकांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या नगरसेविका शांताबाई लंगोटे, झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लंगोटे, मोहन कांबळे, अशोक वाकळे आदींनी केल्या आहेत़ (प्रतिनिधी)
शिधापत्रिकाधारकांना मिळेना रॉकेल
By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST