औरंगाबाद : आपल्या लाडक्या भावासाठी बहिणी राखीपौर्णिमेला ‘जरा हटके’ राखी खरेदी करणे पसंत करीत असतात. नावीन्याचा शोध घेणाऱ्या या बहिणी यंदा चक्क भाऊरायाचा फोटो असलेली राखी खरेदी करीत आहेत. तुम्ही अशी अनोखी राखी पसंत केल्यास लगेच तुमचा भाऊरायाच राखीवर अवतरत आहे. पूर्वी मोठ्या आकारातील स्पंजच्या राख्यांना खूप मागणी असे. मनगटापेक्षा दुप्पट-तिप्पट आकारातील या राख्यांची क्रेझ काळाच्या ओघात कमी झाली. आता या राख्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले आहे. काळाच्या ओघात राख्यांचा आकार कमी होत गेला. डिझाइनर राख्यांनी बहिणींच्या मनावर गारूड घातले. मोती, रंगीत खडे, शिंपले, जरदोजी वर्क केलेले, काचांच्या राख्यांची हातोहात विक्री होऊ लागली. सोने, चांदीसारख्या दिसणाऱ्या राख्याही बहिणींना आकर्षित करू लागल्या. टीव्ही सिरीयलमधील कार्टून पात्रांच्या राखी खरेदीवर चिमुकल्यांच्या उड्या पडू लागल्या. यंदा बाजारात हजारो राख्यांमध्ये यंदा भाऊरायाचे फोटो असलेली राखी नावीन्यपूर्ण ठरत आहे. भावाचा फोटो घेऊन बहिणी ग्रीटिंग कार्डच्या दुकानात जात असून तेथे फोटोचे स्कॅनिंग करून नंतर त्याचे छोट्या आकारातील लाकडावर प्रिंट केले जात आहे. तो फोटो आकर्षक राखीवर चिटकवला जात आहे. यासंदर्भात व्यावसायिक योगेश लोहाडे यांनी सांगितले की, पहिल्यांदाच फोटो लावलेल्या राख्या तयार करून दिल्या जात आहे. याशिवाय भावाचे नावही राख्यांवर साकारले जात आहे. कार्डस् अँड गिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुहास देशपांडे म्हणाले की, अशा २०३८ राख्यांची आजपर्यंत विक्री झाली आहे. या राख्या यंदाचे वैशिष्ट्य ठरत आहेत.
राखीवर अवतरले भाऊराया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 00:51 IST