औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री, सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील काही भागात बुधवारीही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागाकडे पावसाने पाठ फिरविल्याने तेथील शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस झालेल्या भागात पेरण्यांना वेग आला आहे. बुधवारी दुपारी फुलंब्री, वडोदबाजार परिसरात तास-दीडतास चांगला पाऊस झाला. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. या भागात कपाशीची लागवड झालेली असून मक्याची पेरणी सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून त्यांना या पावसाचा फायदा होणार आहे. आळंद, पीरबावडा परिसरात महिनाभरानंतर आजच पावसाने चांगली हजेरी लावल्याने येथे आता पेरणी सुरू होणार आहे. बाजारसावंगी परिसरात बुधवारी दुपारी तासभर झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु अजून दमदार पावसाची गरज आहे. नदी, नाले, विहिरी कोरड्याच आहेत. सोयगाव परिसरात पिकांमध्ये पाणी साचले असून वेताळवाडी धरणात ३ टक्के पाणी वाढले आहे.चिंचोली लिंबाजी परिसरात दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी रात्री व मंगळवारी सायंकाळी रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बुधवारी बळीराजा पेरता झाला आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असला तरी परिसरात पाणीटंचाईचे ढग मात्र कायम आहे. सोमवारी रात्री ९ वाजेनंतर रिमझिम पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. एक तासभर भीज पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी कापूस लागवडीवर भर दिला. मंगळवारी पुन्हा ४ वाजेनंतर रिमझिम पाऊस बरसल्याने बुधवारी पेरणीच्या कामाला वेग आला आहे. नेवपूर, तळनेर, नाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, वडोद, लोहगाव, गणेशपूर, जामडी, चिंचोली लिंबाजी या भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामात मग्न होता; मात्र बरकतपूर, रायगाव, वाकोद, दहीगाव, शेलगाव, दिगाव या परिसरात कमी पाऊस झाला आहे.अजिंठा-अंधारी प्रकल्पात १० टक्के पाणीअजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठा पाऊस झाल्यास प्रकल्पातील पाणीसाठा वाढू शकतो. या धरणातून अजिंठा, शिवना, मादनी या गावांना पाणीपुरवठा होतो. सोयगाव परिसरात तीन दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस झाल्याने सोना नदीला पूर आला होता. वेताळवाडी धरणातील जलसाठ्यातही अल्प वाढ झाली आहे.
जिल्ह्यात काही भागात पाऊस
By admin | Updated: July 17, 2014 01:36 IST