औरंगाबाद : महापौर कला ओझा यांच्या रेल्वेस्टेशन रस्त्यावरील ‘रायगड’ या निवासस्थानावर आज सकाळपासूनच दंगल नियंत्रण वाहनांसह पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी महापौरांच्या निवासस्थानाला अचानक दिलेल्या वेढ्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. आयुक्त पी. एम. महाजन यांना पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी महापौर निवासस्थानी बोलाविले होते. शनिवारी सभेत आयुक्तांना बांगड्यांचा अहेर दिल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयुक्तांनीच बंगल्याला पोलीस बंदोबस्त लावल्याची माहिती सत्ताधाऱ्यांनी दिली. तर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होती. महापौर ओझा यांनी शनिवारच्या सभेत आ.अतुल सावे यांना चुकून श्रद्धांजली अर्पण केली. परिणामी रविवारी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांत त्याचे संतप्त पडसाद उमटले. महापौर निवासस्थानी दगडफेक होण्याची कुणकुण लागल्यामुळे तेथे दंगल नियंत्रण वाहनासह पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचे कळते. पोलीस बंदोबस्त कुणी मागविला. आयुक्तांनी की तुम्ही, यावर महापौर ओझा यांनी काहीही उत्तर दिले नाही. आयुक्तांनी बंदोबस्ताप्रकरणी उत्तर दिले नाही. भाजपा पदाधिकारीही बंगल्यावर होते. त्यांनीही बोलणे टाळले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मौन पाळले असले तरी बंगल्याबाहेर उभे असलेले पोलीस आणि दंगल नियंत्रण वाहन सर्व काही सांगून गेले.
‘रायगड’ला पडला पोलिसांचा वेढा!
By admin | Updated: December 22, 2014 01:20 IST