जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर अवकाळी पावसामुळे रबी पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळी वातावरणामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला. रिमझिम पाऊस व हवेतील गारवा अधिक वाढल्याने असंख्य नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी रेनकोट किंवा उबदार कपड्यांचा वापर करणेच पसंत केले. रविवारी पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्याचा त्रास होत होता. जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा, द्राक्ष, डाळिंब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी काढायला आलेली आहे. परंतु पावसामुळे ती काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. गहू, हरभरा या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सलग दोन दिवस पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जालना तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पून्हा अडचणीत सापडला आहे. अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. रविवारी दिवसभर अधून-मधून रिमझिम पाऊस सुरूच होता. परिसरातील शेतकऱ्यांनी गहु, ज्वार, हरभरा पिकांचे सोंगणी करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान टळले. मात्र अनेक शेतकऱ्यांचे रबी पिके अजून शेतातच उभी आहेत. परतूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. २८ रोजी रात्री सात वाजता पावसास सुरूवात झाली या पावसात गारा व जोराच्या वाऱ्याचा समावेश नसल्याने उभ्या पिकाचे नुकसान झाले नाही. मात्र काढणीस आलेले व व काढून पडलेले गहू व ज्वारी यांचे मात्र नुकसान झाले आहे. या पावसादरम्यान विजेचा लपंडाव सुरूच होता. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. शनिवारी शाळांमध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. भोकरदन तालुक्यात गहू, हरभरा, मका, कांदा सीडचे मोठे नुकसान झाले आहे. सिपोरा बाजार येथील आठवडी बाजारालाही पावसाचा फटका बसला आहे.
अवकाळीचा रबीला फटका
By admin | Updated: March 2, 2015 00:51 IST