औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या शहर वाहतूक बससेवेच्या चालकांना रिक्षाचालकांकडून वारंवार होणारी मारहाण लक्षात घेऊन सोमवारी सिटी बस व्यवस्थापनाने पोलीस आणि आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रवासी पळविण्यासाठी बस थांब्यांच्या ठिकाणी रिक्षा उभ्या करणे, बसच्या मार्गात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे या बेशिस्त रिक्षाचालकांना आवर घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सिडको बसस्थानकावर रविवारी ऑटोरिक्षा चालकांनी सिटी बसच्या दोन चालकांना बेदम मारहाण केली. याविरोधात सिटी बस कर्मचाऱ्यांनी दोन तास चक्काजाम आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर सिटी बस विभागाचे प्रमुख व्यवस्थापक प्रशांत भुसारी आणि उपव्यवस्थापक ओस्तवाल यांनी सोमवारी पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची भेट घेऊन रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शहरात रिक्षा चालकांकडून सातत्याने बसच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी, शिवीगाळ, दादागिरी, मारहाण असे प्रकार होत आहेत. आतापर्यंत शिवाजीनगर, बाबा पेट्रोल पंप चौक, सिडको बसस्थानक आदी ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. रिक्षाचालक त्यांच्या थांब्यांऐवजी सिटी बसच्या थांब्यांवर येऊन थांबतात, त्यामुळे सिटी बसला नाइलाजाने रस्त्यावर थांबावे लागते, ही अडचण दूर करून सिटी बसचा मार्ग सुकर करण्यासाठी ऑटोरिक्षा चालकांना शिस्त लावा, अशी विनंती भुसारी यांनी मकवाना यांच्याकडे केली. यानंतर भुसारी आरटीओ कार्यालयात गेले. मात्र, आरटीओतील वरिष्ठ अधिकारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गेलेले असल्याने भुसारी यांनी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
थांबे निश्चित करून द्यावेत
सिटी बस प्रशासनाच्या वतीने महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचीही भेट घेण्यात आली. शहरात रिक्षांचे थांबे, तिथे उभ्या राहणाऱ्या रिक्षांची संख्या निश्चित करून त्याची माहिती पोलिसांना द्यावी, जेणे करून पोलिसांना वेळोवेळी तपासणी करणे आणि बेशिस्तीला आळा घालणे शक्य होईल, अशी विनंती भुसारी यांनी केली. नियमानुसार एका थांब्यावर दहाच रिक्षांना थांबता येते; परंतु शहरात रिक्षा थांब्यांवर ऑटोरिक्षांची गर्दी असते, असेही ते म्हणाले.