केंद्रीय शहरी विकास विभागामार्फत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर स्ट्रिटस् फॉर पीपल या योजनेत औरंगाबाद महापालिकेने सहभाग घेतला आहे. याअंतर्गत पैठण गेट ते गुलमंडी, क्रांती चौक ते गोपाळ टी चौक, सिडकोतील कॅनॉट परिसर आणि एमजीएम रोड या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. नागरिकांच्या स्वप्नातील रस्ते साकारण्यासाठी डिझाईन स्पर्धा घेण्यात आली. एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थी, आर्किटेक्ट, अभियंते आणि इच्छुकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. चेन्नई, पुणे यासह देशभरातील विविध शहरांतून १०० पेक्षा अधिक तज्ज्ञ स्पर्धकांनी आपल्या संकल्पनेतील डिझाईन सादर केले. स्पर्धकांनी सादर केलेल्या डिझाइनचे १० जानेवारीनंतर व्हॅल्युएशन करणे सुरू झाले. आता हे कामही पूर्ण झाले असून लवकरच निकाल घोषित केला जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक साइटसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर केली आहेत, त्यानुसार संबंधितांचा गौरवही केला जाईल.
सर्वोत्कृष्ट डिझाईनची होणार निवड
पाण्डेय यांनी सांगितले की, चारही रस्त्यांसाठी नावीन्यपूर्ण डिझाईन प्राप्त झाले आहेत. लवकरच या डिझाईनद्वारे शहरात रस्त्यांवर उल्लेखनीय बदल घडलेला दिसेल. निकाल घोषित झाल्यानंतर उत्तम डिझाईननुसार चारही रस्ते विकसित केले जातील.