परभणी : विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले असून, आता विधानसभा निवडणुकीनंतरच ही निवड प्रक्रिया होण्याची शक्यता आहे़ राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपणार आहे़ त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी परभणीसह राज्यभरात जि़प़अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता़ याबरोबरच १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतींसह राज्यातील पं़स़ सभापती, उपसभापतींची निवड होणार होती़ या दृष्टिकोनातून जिल्ह्यात तयारीही सुरू झाली होती़ त्या अनुषंगाने जि़प़ सदस्यांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ग्रामविकास विभागातून अधिकाऱ्यांना मंगळवारी अचानक फोन आला व ही प्रक्रिया तूर्त स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले़ त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड लांबणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील राजकारणात आता अध्यक्षपदासाठी चालू असलेल्या घडामोडी मंदावणार आहेत़ (जिल्हा प्रतिनिधी)
जि़प़अध्यक्षांची निवड प्रक्रिया थांबली
By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST