औरंगाबाद : घराच्या गच्चीवरील टाकीतील पाणीसाठा पाहत असताना तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास मयूर पार्क येथे घडली. या प्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेखा कदम (३८) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील जमादार रामेश्वर कदम यांच्या त्या पत्नी होत. सकाळी ५ वाजेच्या सुमारास त्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीतील पाणीसाठा पाहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्याच्या टाकीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन त्या टाकीत पडल्या. टाकीत भरपूर पाणी असल्याने त्या पाण्यात बुडाल्या. दरम्यान, सहा ते सव्वासहा वाजेच्या सुमारास त्यांचे पती झोपेतून उठले, तेव्हा त्यांना रेखा घरात दिसली नाही. त्यानंतर तिचा शोध घेत ते घराच्या गच्चीवर गेले आणि पाण्याच्या टाकीत डोकावून पाहिले असता रेखा टाकीत पडलेली दिसली. त्यांनी इतर लोकांच्या मदतीने रेखाला बेशुद्धावस्थेत टाकीतून बाहेर काढले. घाटीत दाखल केले असता अपघात विभागातील डॉक्टरांनी रेखा यांना तपासून मृत घोषित केले. हर्सूल सावंगी या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाण्याच्या टाकीत पडल्याने पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू
By admin | Updated: January 15, 2016 00:05 IST