रेणापूर : रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी येथील न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे़ कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या एकावर लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत़ रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर गुरुवारी सकाळी संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चाकू हल्ला करून अंगावर काळी शाई फेकली़ कार्यालयात अचानक गोंधळ सुरु झाल्याने तेथील काही कर्मचाऱ्यांनी तो थांबविण्याचा प्रयत्न करण्याबरोबर मारहाण केली़ याप्रकरणी गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांनी सिद्धेश्वर गरड (समसापूर), संतोष श्ािंदे (रेणापूर), शिवराज खताळ (जवळगा), रमेश पवार (वाला), बंकट पवार (गव्हाण), चंद्रकांत माने (हारवाडी), इलाही शेख (गोविंदनगर) या सात जणांना अटक केली़ या प्रकरणातील आठवा आरोपी बंकट बाजीराव दत्त (समसापूर) यास जबर मारहाण झाल्याने तो जखमी झाला आहे़ त्यामुळे त्याच्यावर लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत़ या प्रकरणाचा तपास रेणापूर पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)सात जणांना अटक...या सातही आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची (शनिवारपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे़ अधिक तपास पोलिस निरीक्षक डी़पी़पाटील करीत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता़ तिथे एक चाकू, काळ्या शाईची बॉटल, भगव्या रंगाचे दोन उपरणे आढळून आले़ पोलिसांनी ते जप्त केले आहेत़ पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी आपणास जबर मारहाण केली असल्याचे बंकट दत्त याने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे़ मारहाण केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा रेणपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़
‘त्या’ हल्लेखोरांना पोलिस कोठडी
By admin | Updated: June 21, 2014 00:52 IST