औरंगाबाद : पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकातील जमादारावर धारदार शस्त्राने वार करीत एका तडीपार गुंडाने पलायन केले. ही घटना काल सायंकाळी प्रतापनगर मैदानावर घडली. या हल्ल्यात उस्मानपुरा ठाण्याचे जमादार एम.एन. दांडगे यांना किरकोळ जखम झाली. नारायण सुभाष साळवे (२२, रा. नागसेननगर) असे या तडीपार गुंडाचे नाव असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्याचा साथीदार विश्वासकांत रमाकांत खरे (१९, रा. नागसेननगर) हा मात्र पोलिसांच्या हाती लागला. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक भरत काकडे यांनी सांगितले की, आरोपी नारायण साळवे याच्या वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे काही दिवसांपूर्वी त्याला औरंगाबाद शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानाही तो पोलिसांची नजर चुकवून शहरात नुसते वास्तव्यच करीत नव्हता, तर साथीदारांच्या मदतीने गुन्हेही करीत होता. गेल्याच महिन्यात त्याने एका रिक्षाचालक साथीदाराच्या मदतीने दोन प्रवाशांना लुटले होते. या लुटमारीप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे, तेव्हापासून नारायणला पोलीस शोधत होते. दरम्यान, नारायण व त्याचा गुन्हेगार साथीदार विश्वासकांत खरे हे दोघे प्रतापनगरातील मैदानात बसले असून ते काही तरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती काल सायंकाळी उस्मानपुरा पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. लगेच जमादार एम.एन. दांडगे यांना काही सहकाऱ्यांसह प्रतापनगरला पाठविण्यात आले. तेथे दोन्ही आरोपी पोलिसांच्या नजरेस पडले. झडप मारून पोलिसांनी त्यांना पकडले, तेव्हा विश्वासकांत तर सापडला; परंतु नारायणने खिशातून धारदार शस्त्र काढले आणि जमादार दांडगे यांच्या हातावर वार करीत स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. नारायणच्या हल्ल्यात दांडगे यांच्या हाताला जखम झाली. या प्रकरणी दांडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण व त्याचा साथीदार विश्वासकांत या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक काकडे यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक गवळी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. पोलिसावर हल्ला करणारा मुरीद तडीपारअशाच प्रकारे लुटमारी, पोलिसांवर हल्ले करणारा उस्मानपुरा परिसरातील आसूरखाना येथील रहिवासी असलेला कुख्यात गुन्हेगार मुरीद खान समशेरखान पठाण (३३) याच्या वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला औरंगाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले. मुरीदनेही गेल्या वर्षी रेल्वेस्टेशन परिसरात पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखा पोलिसांवर तलवारीने हल्ला केला होता.
तडीपार गुंडाचा पोलिसावर हल्ला
By admin | Updated: September 4, 2014 00:53 IST