जालना : गेल्या दोन तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याने पूर्णत: हपकून गेलेल्या कोरडवाहू व बागायतदार शेतकऱ्यांनी किमान यावर्षीच्या हंगामातील खरीप-रब्बी पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पीक विम्याचा मोठ्या प्रमाणावर भरणा सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पीक विमा भरण्याचे रेकॉर्ड बे्रक होईल, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने वर्तविला आहे. या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापूर्वी दुष्काळाने, गेल्यावर्षी गारपिटीने खरीप व रब्बी पिकांना मोठा तडाखा दिला होता. त्या सलग दोन वर्षाच्या नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य शेतकरी हपकून गेला होता. विशेषत: या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने दुष्काळी स्थितीत सहाय्य अनुदान म्हणून प्रति हेक्टरी ठराविक रक्कम वितरीत केली. फळ उत्पादकांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या अल्पशा मदतीने शेतकऱ्यांचे फारशे काही साधले नाही.या पार्श्वभूमीवर यावर्षीही आतापर्यंत पडलेल्या अल्पशा पावसाने सर्वसामान्य शेतकरी हादरून गेला आहे.त्यामुळेच या गोंधळलेल्या शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकांना यावर्षी का होईना विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून मोठी धडपड सुरू केली आहे. या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर विमा कंपन्यांनी आपदग्रस्तांना विम्याच्या रक्कमा वितरीत केल्या. त्याचा थोडाबहूत का असेना फायदा शेतकऱ्यांना झाला. यावर्षी सुद्धा स्थिती गंभीर आहे. त्यामुळेच गावोगावच्या शेतकऱ्यांनी पीक विम्यावर उशिराने का होईना लक्ष केंद्रीत केले आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करीत शेतकरी बँकांकडे धाव घेऊ लागले आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पीकविम्यास ३१ जुलैपर्यंत मुदत दिल्या गेली होती. कृषी खात्याने पीक विम्याची ही मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. परंतु ही मुदतवाढ ३१ जुलैनंतर वाढीव दिनांकापर्यंतच पेरणी झालेल्या क्षेत्रास लागू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. प्रस्ताव दाखल करावे व त्याद्वारे विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहनही केले. (जिल्हा प्रतिनिधी)
पीकविम्याचा रेकाँर्ड बे्रक
By admin | Updated: August 6, 2014 02:16 IST