जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने व सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व बीडीओ व ग्रामपंचातींच्या ग्रामसेवकांना वृक्षलागवड करून त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली आहे. अन्यथा संबंधित ग्रामसेवकांचे वेतन अदा न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाअंतर्गत शतकोटी योजनेअंतर्गत तसेच मग्रारोहयोअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु आतापर्यंत ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यंदा पाऊस विलंबाने पडल्याने ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड कार्यक्रम राबविला नाही, असे सांगण्यात येते. परंतु गेल्या पंधरवाड्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने व येत्या काही दिवसांतही पाऊस चांगला पडण्याची शक्यता असल्याने सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी बीडीओ व ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती वेबसाईटवर न टाकल्यास संबंधित ग्रामसेवकांचे पगार अदा न करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजनांमार्फत मिळणारे अनुदानही थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासदंर्भात उपमुख्य कार्यकारी पी.टी. केंद्रे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, याबाबत सर्व बीडीओंना व ग्रामसेवकांना पूर्वसूचना देण्यात आल्या असून काही ग्रामसेवक वृक्षलागवड कार्यक्रमाच्या तयारीलाही लागल्याचे केंद्रे यांनी सांगितले. सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत अपेक्षित वृक्षलागवड करून त्याचे संवर्धनही केले जाईल, असा विश्वास केंद्रे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किमान ५०० तर एक हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किमान १००० वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. आठवडाभरात वृक्षलागवड केल्याची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर टाकण्याची सूचना ग्रामसेवकांना देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पंचायत विभागाकडे प्रमाणपत्रही देणे आवश्यक आहे.
‘वृक्षलागवड करा, अन्यथा पगार नाही’
By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST