लातूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत असलेल्या अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. वर्षातून किमान दोनदा त्यांचे मानधन रखडत आहे. आता गेल्या तीन महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.लातूर जिल्ह्यात २४०० अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांतील शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांच्या पालणपोषणाची जबाबदारी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांवर आहे. १ लाख ८५ हजार बालके या अंगणवाड्यांत दररोज येतात. यातील ९५ टक्के बालके सुदृढ श्रेणीत आहेत. तर कमी वजनाची ७ हजार बालकांची संख्या आहे. या सर्व बालकांच्या पालणपोषणाची जबाबदारी घेणाऱ्या मदतनीस व अंगणवाडी कार्यकर्तींचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. गतवर्षीही त्यांचे वेतन रखडले होते. मोर्चा, आंदोलने केल्यानंतर मानधन देण्यात आले. आता गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेलेच आहे. २४०० अंगणवाडी कार्यकर्ती व २२४१ मदतनीस जिल्ह्यात आहेत. एकूण ४ हजार ४४१ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस म्हणून सेवा देत आहेत. त्या आपले कर्तव्य चोख बजावतात. परंतु, त्यांचे मानधन नियमित मिळत नाही. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांमुळेच लातूर जिल्हा कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. कुपोषणमुक्तीत लातूर जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मराठवाड्यात पहिला आहे. केवळ आणि केवळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांचे काम चांगले असल्यामुळे हे यश मिळाले आहे. असे असतानाही त्यांच्या मानधनाचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अंगणवाडी कार्यकर्र्तींना ५ हजार व मदतनिसांना २५०० रुपये असे तुटपुंजे मानधन आहे. या मानधनात वाढ करावी, अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस संघटनेने राज्य शासनाकडे लावून धरली आहे. ही मागणी दूरच. परंतु, जे मानधन आहे तेही नियमित मिळत नसल्यामुळे त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आता तर गेल्या तीन महिन्यांपासून मानधन रखडल्यामुळे उपासमारीची वेळ आली असल्याचे अंगणवाडी कार्यकर्ती सांगताहेत.
तीन महिन्यांपासून वेतन रखडले !
By admin | Updated: January 8, 2015 00:58 IST