स.सो. खंडाळकर
औरंगाबाद: जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्समध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल काही तक्रारी असल्या तरी दोनवेळा न चुकता रुग्णांना वेळेवर जेवण दिले जाते आहे; मात्र कोविड सेंटरच्या जेवणाला घरच्या जेवणाची सर येत नाही. शेवटी घरचे जेवण घरचे जेवण असते, अशी एक सार्वत्रिक प्रतिक्रियाही आहे.
..........................
जिल्ह्यातील एकूण कोविड सेंटर-८०
या सेंटर्समध्ये दाखल रुग्ण-६ हजार ३७६
.................................
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणतात....
इतर कोविड सेंटरबद्दल मी माहिती देऊ शकणार नाही; परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या ३४७ कोरोना रुग्णांवर उपचार चालू असून त्यांना सकाळ संध्याकाळ शिवभोजन देण्यात येते. कोणाला जर घरुन डबा मागवायचा असेल तर तशी परवानगी आम्ही देतो. महापालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या कोविड सेंटरबद्दलची माहिती मी देऊ शकणार नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जीवनाच्या वेळेबद्दल व दर्जाबद्दल कोणाची तक्रार नाही.
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद
..............................................
सिपेट: या ठिकाणी सध्या उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने सांगितले की, माझा आजचा तिसरा दिवस आहे. मला सकाळी ९ वाजता चहा, नाश्ता मिळतो. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता जेवण मिळते. त्यात तीन चपात्या, भाजी, भात -वरण व एखादा गोड पदार्थ असतो. दुपारी ४ वाजता चहा आणि सायंकाळी ७ वाजता पुन्हा जेवण...! जेवण चांगले आहे. त्याबद्दल तक्रार नाही.
....................................
लासूर स्टेशन: ग्रामीण भागात सुरू असलेल्या लासूर स्टेशन कोविड सेंटरमध्ये रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांनाही मोफत जेवण दिले जाते. यासंबंधीचे वेळापत्रकच ठरलेले असून त्यानुसार येथे सारी कामे पार पडत आहेत. रुग्णांना औषधीही मोफत दिली जात आहेत.
..........................................
मेल्ट्रॉन: याठिकाणी उपचार घेऊन घरी परतलेल्या महिला रुग्णाने सांगितले की, येथे स्वच्छताही चांगली आहे. जेवणही चांगले मिळते. परंतु आमच्या कुटुंबीयांनी दररोज डबा दिल्यामुळे मला इथले जेवण घेण्याची आवश्यकता भासली नाही.
............................
घाटी हॉस्पिटलमध्ये मिळते चांगले जेवण...
औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या भरपूर आहे. तरीही या ठिकाणी रुग्णांना चांगले भोजन मिळते व वेळेवर जेवण मिळते. बाहेरून आलेले डबे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची येथे चांगली व्यवस्था आहे. रोज तेच तेच जेवण घेऊन कंटाळलेल्या रुग्णांना घरची परिस्थिती बरी असलेल्या कुटुंबांकडून नॉनव्हेजचे डबेही पुरवले जातात.