जालना : जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रत्येक पंचायत समित्यांमधील अभिलेखांची तसेच पूर्ण, अपूर्ण कामांची तपासणी केली. यातील काही किरकोळ त्रुट्या संबंधित पंचायत समित्यांनी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामीण भागाच्या विकास कामांचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांमधील कारभार विस्कळीत असल्याचा प्रकार काही दौऱ्यांमध्ये खुद्द सीईओंच्या निदर्शनास आला होता. कृषी, समाजकल्याण, पाणीपुरवठा या विभागाअंतर्गतच्या वाटप करावयाचे साहित्य, इंदिरा आवास योजनेअंतर्गतच्या निर्दूल चुली, ब्लँकेटचे वाटप अद्यापही झालेले नव्हते. मार्च २०१४ पूर्वीपासून हे साहित्य पंचायत समित्यांकडे पडून आहे. तत्कालीन पालकमंत्री राजेश टोपे यांनीही सीईओंना या बाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे पंचायत समित्यांमधील अन्य कामकाजासंबंधीही काही तक्रारी सीईओंना प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सीईओ देशभ्रतार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली १२ विभागांमधील २४ जणांचे एक पथक तयार केले. पथकात तपासणी अधिकारी व नियंत्रक अधिकाऱ्यांसह अन्य २२ जणांचा सहभाग होता. गेल्या दोन-तीन महिन्यात जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले. यामध्ये ३० व ३१ मे पासून सुरू झालेली ही तपासणी आॅगस्टपर्यंत चालली. त्यानंतर प्रत्येक पथकांनी सीईओंकडे अहवाल सादर केले. त्यात काही किरकोळ त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी संबंधित पंचायत समित्यांना ठराविक मुदत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा या पथकांनी त्रुट्या दूर केल्याची खात्री करून अंतिम अहवाल सीईओंना सादर केला. तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींची खातरजमा विभागप्रमुखांकडून केली. यात अपूर्ण अभिलेखांच्या तसेच विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ न दिल्याच्या तक्रारी होत्या. (प्रतिनिधी)
पंचायत समित्यांच्या कामाला आला वेग..!
By admin | Updated: October 27, 2014 00:09 IST