फुलंब्री : फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाला बडोदा येथील एका कंपनीकडून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट मिळाला आहे. या प्लांट उभारणीचे काम शेवटच्या टप्प्यात असून प्रतिमिनिट १६० लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. आगामी पंधरा दिवसांत हा प्लांट प्रत्यक्षात कार्यान्वित होणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी तो संजीवनी ठरणार आहे, तर ग्रामीण भागात ऑक्सिजन निर्माण करणारे पहिले रुग्णालय म्हणून फुलंब्रीची ओळख निर्माण होईल.
बडोदा येथील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या एफएमसी इंडिया या कंपनीने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाला १९ लाख किमतीचा ऑक्सिजन प्लांट दिला आहे. प्लांटची सर्व मशिनरी, विविध महत्त्वपूर्ण पार्ट रुग्णालयात दाखल झाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्षात प्लांट कार्यान्वित होणार आहे. त्याअनुषंगाने रुग्णालयात काम सुरू करण्यात आले आहे.
---
प्लांट ठरणार वरदान
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पहिला ऑक्सिजन प्लांट म्हणून फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाची ओळख निर्माण होणार आहे. या ऑक्सिजन प्लांटचा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उपयोग होणार आहे. आगामी काळात ऑक्सिजन सिलिंडर बाहेरून आणण्याची गरज भासणार नाही. फुलंब्रीवासीयांना हा ऑक्सिजन प्लांट वरदान ठरणार आहे. गंभीर रुग्णांसाठी ही संजीवनीच असेल.
---------
ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटमधून एका मिनिटात १६० लिटर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. हा ऑक्सिजन रुग्णाकरिता पुरेसा राहील, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली.
-----
130721\oksijan plant.jpg
फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात दाखल झालेला ऑक्सीजन प्लांट