लोकमत न्यूज नेटवर्करामपुरी : मानवत तालुक्यातील रामपुरी येथे गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास झालेल्या जोरदार पावसात परिसरातील ओढ्याला आलेल्या पुरात बैलांसह गाडी वाहून गेली़ बैलगाडीतील सालगडी धोंडीराम सखाराम हुलगुंडे यांना वाचविण्यात यश आले आहे़ रामपुरी परिसरात गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील ओढ्याला पूर आला़ यावेळी शेतकरी दुर्गादास जयवंतराव साठे यांचा सालगडी धोंडीराम सखाराम हुलगुंडे (रा़ करंजी, ता़ जिंतूर) हा ओढ्यातून बैलगाडी घेऊन येत होता़ पाण्याचा वेग अधिक असल्याने व अंदाज आला नसल्याने बैलांसह गाडी पाण्यात वाहून गेली़ कैलास शिवाजीराव यादव व अण्णासाहेब मारोती राऊत या दोन शेतकऱ्यांनी सालगडी धोंडीराम हुलगुंडे यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविले़ यावेळी वाहून गेलेल्या एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बैलाला पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले़
बैलांसह गाडी गेली वाहून
By admin | Updated: June 15, 2017 23:32 IST