औरंगाबाद : महापालिकेची उद्याने लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याने ठिकठिकाणी गवत वाढले असून, कचरा साचला आहे. त्यामुळे उद्यानांसह खुल्या जागांची स्वच्छता ठेवा, असे आदेश पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. सुराणानगर येथील उद्यानाची पाण्डेय यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी साफसफाई करा व शहरातील उद्यानांच्या जागांची तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश दिले.
१०० बस थांबे बांधल्याचा दावा
औरंगाबाद : शहर बससाठीच्या थांब्यांचे काम लॉकडाऊनच्या काळात रखडले होते; पण गेल्या काही दिवसांत कामाने पुन्हा गती घेतली असून, आतापर्यंत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एएससीडीसीएल) बीओटीच्या माध्यमातून १०० बसथांब्यांचे काम पूर्ण केले आहे. एएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कळ शिवम यांनी बस थांब्यांच्या माध्यमातून महसूलही मिळणार असल्याचा दावा केला.
कोरोना लसीकरण; आज ड्राय रन
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.८) दोन ठिकाणी कोरोना लसीकरणनिमित्ताने ड्राय रन होणार आहे. यात सकाळी ९ ते ११ या वेळात प्रत्यक्षात लस टोचणीव्यतिरिक्त लसीकरणाची रंगीत तालीम होईल, अशी माहिती गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात शहीद भगतसिंग हायस्कूल बजाजनगर तर वैजापूर येथील आरोग्य उपकेंद्रात हे ड्रायरन होणार आहे. कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालिमीनिमित्त शहरात पूर्वतयारीच्या अनुषंगाने सकाळी ९ वाजता एन-११ येथील आरोग्य केंद्रापासून ड्राय रन घेणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ड्राय रनसाठी मनपा मुख्यालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणात शंका, अडचणींचे निरसन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. मेघा जोगदंड, डॉ. शैलजा तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी मार्गदर्शन केले.
किराडपुऱ्यात मोबदला घेऊन केले अतिक्रमण
दिवसभर पाडापाडी : मनपाने कारवाई करीत ताब्यात घेतली जागा
औरंगाबाद : महापालिकेने २०१२ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविताना मोबदला देऊनही पुन्हा त्या जागांवर रहिवाशांनी केलेले अतिक्रमण महापालिकेने गुरुवारी दिवसभर कारवाई करून हटवले. किराडपुरा चौक ते शरीफ कॉलनीचा रस्ता न्यायालयीन प्रक्रियेमुळे तयार झाला नाही. मात्र, श्रीराम मंदिर ते आझाद चौक या रस्त्याचे काम झालेले असताना अनेकांनी त्यावर पक्की बांधकामे करून अतिक्रमणे केली होती. रस्त्यातच वाळूच्या ट्रक आणि ट्रॅक्टर उभे करून वाहतुकीला अडथळा आणला जात होता. याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासकांकडे तक्रारी केल्या होत्या. महापालिकेचे पथक कारवाईसाठी येताच तेथे मोठा जमाव आला. जमावाने अधिकाऱ्यांशी वादही घातला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १३ अतिक्रमणांवर कारवाई केल्याचे इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी सांगितले. उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह उपअभियंता संजय कोंबडे, शाखा अभियंता कारभारी घुगे आदींनी सकाळपासून अतिक्रमण मोहीम राबविली. आझाद चौक ते रोशन गेट या रस्त्याने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. रुंदीकरणात मोबदला घेऊनही रस्त्यावर बांधलेले ओटे, पत्र्याचे शेड, टपऱ्यांसह इतर अतिक्रमणे हटविण्यात आली.