वाळूज महानगर : घरात नवीन वीज मीटर घेण्यासाठी सर्वेक्षण अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरण कंपनीच्या लाईन हेल्पर व अन्य एकास काल सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडून त्यांना अटक केली.वाळूज येथील प्रभाकर गायकवाड यांनी त्यांच्या नवीन घरात वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीच्या वाळूज कार्यालयात अर्ज सादर केला होता. यावेळी वीज मीटर सर्वेक्षण अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी लाईन हेल्पर रमेश नारायण पवार यांनी प्रभाकर गायकवाड यांच्याकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे गायकवाड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून लाईन हेल्परची तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ सप्टेंबरला वाळूजला लांझी रोडवर सापळा रचला होता. तक्रारदार गायकवाड याने लाईन हेल्पर रमेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता पवार याने गायकवाड यांना लांझी रोडवर असलेल्या ओंकारेश्वर मल्टी सर्व्हिसेस या दुकानात शुभेंद्र ऊर्फ शिवा अशोक वाघ यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगून फोनवरून संपर्क करण्यास सांगितले होते. या दुकानावर शुभेंद्र ऊर्फ शिवा वाघ यास पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर व लाईन हेल्पर रमेश पवार याच्याशी फोनवर संपर्क साधल्यानंतर अटक करण्यात आली. यानंतर पथकाने वाळूजच्या सबस्टेशन क्वॉर्टर येथून लाईनमन रमेश पवार यास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.एम. स्वामी, प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक एस.आर. ठोंबरे, पोलीस निरीक्षक अनिता वराडे, कर्मचारी विक्रम देशमुख, हरिभाऊ कुऱ्हे, नीलेश घोडके, बाळासाहेब चव्हाण, चालक शेख मतीन यांचा सहभाग होता.
३ हजारांची लाच मागणाऱ्या लाईन हेल्परसह एकास अटक
By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST