औरंगाबाद : संस्कृतप्रचूर प्राकृत मराठीचे रूप आता अधिक सहज सोपे होणार असून, शुद्धलेखनाचे नवे नियम लवकरच मूर्तरुपात येणार आहेत. गेली पाच दशके प्रलंबित असलेला हा प्रकल्प येत्या काळात लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.‘माझा मराठाचि बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. बोलताना साधी-सहज वाटणारी मराठी लिहिताना मात्र, अनेकदा किचकट व क्लिष्ट वाटते. ऱ्हस्व, दीर्घ, समास, संधी अशा रुपातील ही जाचक बंधने आता बरीचशी सैल होतील. यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली असून, ही समिती लवकरच आपला मसुदा शासनाला सादर करणार आहे. महामंडळाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीत भाषातज्ज्ञ प्रा. चंद्रकांत मरगज, व्याकरण अभ्यासक अरुण फडके, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, भाषाभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी व शोभा उबगडे यांचा समावेश आहे. व्याकरणाचे हे नवे नियम वापरण्याच्या दृष्टीने सुटसुटीत व लवचीक करण्यावर समितीचा भर असल्याचे सदस्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मराठी मुख्यत: दीर्घ पद्धतीने वापरली जाते. संस्कृत अकारांत आहे. परिणामी लेखनादरम्यान समास, संधी यांचा वापर करताना अनेकांची फसगत होते. हे टाळत मराठीसाठीची स्वतंत्र लेखन पद्धती आकाराला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या नियमांचा सविस्तर मसुदा लवकरच महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन व चर्चेनंतर सुधारणा करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
आता मराठी व्याकरण होणार सहज सोपे
By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST