रमेश शिंदे , औसासोसायटी, पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष, दोन वर्षे उलटली आहेत़ परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच नवीन सहकार कायदा यामुळे या संचालक मंडळांना मुदतवाढ मिळत गेली. पण आता विधानसभा निवडणुका संपल्या असतानाच सहकार क्षेत्रातील निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुदत संपलेल्या ५३ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आणि १४ पतसंस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत. या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५ सोसायट्या व १२ पतसंस्था, तर दुसऱ्या टप्प्यात ३८ सोसायट्या व २ पतसंस्थांच्या निवडणुका होत आहेत. गावपातळीवर होणाऱ्या या निवडणुका गावातील वर्चस्वासाठी महत्वाच्या असून, लवकरच या रणधुमाळीस प्रारंभ होत आहे. औसा तालुक्यात २७२ संस्था आहेत. यामध्ये ७६ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, ५१ मजूर सोसायट्या, ५५ गृहनिर्माण सोसायट्या, १८ कर्मचारी पतसंस्था, १५ नागरी व ग्रामीण पतसंस्था तर इतर ३३ अशी संस्थांची संख्या आहे. यामधील बहुतांश संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. कुणाला एक वर्ष, कुणाला दोन वर्षे तर कुणाला अडीच वर्षांची मुदतवाढ मिळाली. संचालक मंडळास मुदतवाढ मिळत असल्याने निवडणुका कधी होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले होते. पण आता दोन टप्प्यांत या निवडणुका होणार असून, डिसेंबर-जानेवारीमध्ये पहिला टप्पा तर जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दुसरा टप्पा अशा निवडणुका होणार असून, ११ नोव्हेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक वसंत घुले यांनी दिली आहे. औसा तालुक्यात पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या गावांमध्ये आशिव, लोदगा, शिवणी, देवंग्रा, याकतपूर, कारला, मोगरगा, उटी (बु.), खुंटेगाव, आंदोरा, चलबुर्गा, बोरगाव (न.), सिंदाळा (लो.), हिप्परगा, हारेगाव या १५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांसह औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, अजिम शिक्षक पतसंस्था, विद्यानिकेतन कर्मचारी पतसंस्था जवळगा (पो.), रामनाथ शिक्षक पतसंस्था आलमला, सुदर्शन कर्मचारी पतसंस्था सत्तरधरवाडी, साने गुरुजी खाजगी शिक्षक पतसंस्था औसा, कादरिया कर्मचारी पतसंस्था औसा, मुक्तेश्वर वीज कर्मचारी पतसंस्था औसा, समता नागरी पतसंस्था औसा, सुशिलादेवी किल्लारी, भूकंपग्रस्त किल्लारी, गणेशनाथ उजनी या सर्व संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता गावपातळीवरील निवडणुकांच्या रणधुमाळी सुरुवात होणार असून, निवडणुका लक्षात घेता आता गावा-गावांत निवडणुका आणि पॅनलच्या तयारीने वेग घेतला आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत आणि वि.का. सेवा सोसायट्या या स्थानिक राजकारणासाठी महत्वाच्या मानल्या जातात. आता हिवाळ्याची सुरुवात होत असून, ऐन थंडीत गावपातळीवरील राजकारणाला मात्र ऊब मिळणार आहे.
आता सोसायटींच्या निवडणुकांची रणधुमाळी
By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST