रमेश कोतवाल , देवणीनिसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे़ तालुक्यातील सर्वत्र समान पाऊस पडत नाही़ परंतु, पर्जन्यमापक असलेल्या ठिकाणी पाऊस झाल्यास त्याची नोंद संपूर्ण महसुलात धरली जाते़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही़ त्यामुळे गावनिहाय पर्जन्यमापक बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ गेल्या १० वर्षाच्या कालावधीत तालुक्यात समान पाऊस झाला नाही़ तालुक्यातील काही गावात जास्त पाऊस तर काही गावात कमी पाऊस अशी स्थिती झाली आहे़ देवणी तालुक्यात ४८ महसुली गावे आहेत़ या गावांचा समावेश २२ तलाठी सज्जामध्ये आहे़ तालुक्यामध्ये झालेल्या पावसाची नोंद अचूक पद्धतीने व्हावी म्हणून पर्जन्यमापक बसविण्यात आले़ या पर्जन्यमापकावरून प्रत्येक सज्जात किती पाऊस झाला, याची माहिती सरकारी दफ्तरी नोंदली जाऊ लागली़ त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या परिसरात झालेल्या पावसाची माहिती मिळण्यास मदत होऊ लागली़ गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी-जास्त पाऊस होत आहे़ गावात पडलेला पाऊस शिवारात दिसत नाही़ त्यामुळे पर्जन्यमापक असले तरी त्याचा उपयोग होईनासा झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनाही पावसाचा अंदाज येईनासा झाला आहे़ देवणीसह तालुक्यात वलांडी, बोरोळ या महसूल मंडळात केवळ पावसाची नोंद केली जाते़ त्यावरून तालुक्याची सरासरी पर्जन्यमान गृहित धरले जाते़ कमी-जास्त पावसामुळे या नोंदी चुकत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा व विम्याचा अपेक्षितरित्या लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ गावनिहाय पर्जन्यमापक बसविल्यास नेमक्या पावसाची नोंद होऊन शासनाबरोबरच शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़ शेतकऱ्यांना फायदेशीऱ़़शेतकऱ्यांच्या हितासाठी पर्जन्यमापक आवश्यक आहे़ किमान तलाठी सज्जानिहाय पर्जन्यमापक बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत असून, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी सांगितले़ हवामानावर आधारित सर्व बाबींची अचूक नोंद करणारी यंत्रणा मंडळ अधिकारी स्तरावर बसविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे़ तो मंजूर व्हावा म्हणून प्रयत्न सुरु असल्याचे तालुका कृषी अधिकारी देवराव सावळे यांनी सांगितले़
पर्जन्यमापक हवे
By admin | Updated: July 17, 2014 01:35 IST