शरद वाघमारे , नांदेडमहाराष्ट्राला लाभलेले सांस्कृतिक वैभव अन् सातासमुद्रापल्याड नावलौकिक मिळविलेल्या मराठमोळ्या लावणीने सहयोग युवक महोत्सवात नऊवारी साडी, नाकात नथ अशा विविध शृंगाराने नटलेल्या अदाकारित प्रेक्षकांच्या मनात प्रेमळ धडकी भरविली, युवक-युवतींच्या टाळ्या अन् शिट्यांनी सदरील परिसर दणाणून गेला़सहयोग युवक महोत्सवात मुख्य आकर्षण असलेल्या लावणी या कला प्रकाराला सोमवारी दुपारी सुरुवात झाली़ 'सोडा सोडा राया हा नाद खुळा' ही शृंगारिक लावणी प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या निता खोबे हिने सादर केली़ या लावणीने सर्वांना ठेका धरायला भाग पाडले़ कै़रमेश वडपूरकर महाविद्यालय सोनपेठच्या श्रावस्ती पानपाटील हिने 'गेली कुठे गावाला जरा खाजवा की बुगडी माझी शोधायला' ही लावणी सादर केली़ 'पावणं इचार काय हाय तुमचा' ही ठसकेबाज बैठकी लावणी संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेडच्या पूजा माने हिने सादर केली़'झाल्या तिन्ही सांजा, करून शृंगार साजा, वाट पाहते मी गं' अशी शृंगारित लावणी भाग्यश्री सिताप या ज्ञानोपासक महाविद्यालय परभणीच्या विद्यार्थिनीने सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली़ लाल बहादूर शास्त्री धर्माबाद महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन सलगरे याने स्त्रीचा पेहराव करून 'मी छत्तीस नखरे वाली, मला लाखाची मागणी' ही लावणी सादर करून शिट्यांची वाहना मिळविली़रेणुका देवी महाविद्यालयाच्या दृष्टी राठोड हिने नटरंग चित्रपटातील 'मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा' या लावणीवर नृत्याविष्कार केले़ अनिल उमरे व प्रतिभा पाटील यांनी संगीतावर साथ दिली़ शृंगाराचा बाज दाखवित शिवाजी महाविद्यालय कंधारच्या आशा भालेराव हिने 'नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान' ही लावणी सादर करून प्रेक्षकांना ही नृत्य करायला भाग पडले़ लावणी स्पर्धेत श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पुर्णेची जुही खंडागळे, संभाजी केंद्रे महाविद्यालय जळकोटेची शुभांगी केंद्रे आदी विद्यार्थ्यांनी लावणीचा नृत्याविष्कार सादर करून युवक महोत्सवात रंग भरला़ दुपारी मुख्य मंचावर लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती़ काही अनुचित प्रकार होवू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़
नाकी डोळी छान रंग गोरा गोरापान
By admin | Updated: September 30, 2014 01:24 IST