औरंगाबाद : महापालिकेत भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा करणारा आकृतिबंध मागील एक वर्षापासून मंत्रालयात धूळ खात पडला आहे. अधिकाऱ्यांच्या स्तरावर आकृतिबंध मंजूर झाला असला तरी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून अद्याप हिरवा झेंडा दाखवलेला नाही. महापालिकेतील मोठ्या पदावरील अधिकारी लवकरच निवृत्त होत आहेत. त्यामुळे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागण्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नाही.
महापालिकेच्या नोकर भरतीसंदर्भातील आकृतिबंध अनेक वर्षांपासून महापालिका स्तरावर रखडला होता. तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी १८ जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत आकृतिबंध व सेवा भरती नियमांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यावेळी सर्वसाधारण सभेने ३६ दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दुरुस्त्या करून आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे गरजेचे असताना तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व उपायुक्त मंजुषा मुथा यांनी नवीनच प्रस्ताव तयार करून तो १८ जुलै २०१९ च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अधिकारी संघटनेने आक्षेप घेतला व जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. गतवर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्ताव पाठवून काही दिवसात एक वर्ष पूर्ण होईल. मात्र अद्याप आकृतिबंधाला मंजुरी मिळालेली नाही. या प्रस्तावात शासनाने दुरुस्त्या सुचविल्या. त्या महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर पदोन्नतीबाबतही आक्षेप घेण्यात आला. आता पदोन्नत्याही देण्यात आल्या, पण अद्याप आकृतिबंध मंजूर झालेला नाही.
प्रतिनियुक्तीवर अधिकारी येणार
शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, प्राणीसंग्रहालय संचालकांसह अनेक अधिकारी आगामी सहा महिन्यात निवृत्त होत आहेत. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर महापालिकेत जम्बो भरती होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण आकृतिबंधाची मंजुरी लांबणीवर पडत असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. प्रतिनियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी अलीकडेच दिले आहेत.