औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्यावर आज नगरसेविकांनी सभागृहात खुलासा करीत असताना बांगड्या भिरकाविल्या. सर्वपक्षीय महिला नगरसेविकांनी दीड तास आयुक्तांना सभागृहातून बाहेर पडू दिले नाही.विकासकामे होत नाहीत, असा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत करीत गदारोळ केला. आयुक्त खुलासा करीत असताना म्हणाले की, संसार करीत असताना आपण अनावश्यक खर्च करीत नाही. हे महिलांना माहिती असते. मनपाच्या बजेटमध्ये अनेक अनावश्यक कामांचा भरणा झालेला आहे. मनपा व शहराची परिस्थिती नगरसेवकांना माहिती आहे. कुवत नसताना बजेटमध्ये कामे टाकून ठेवली आहेत, असे आयुक्तांना म्हणायचे होते. आयुक्त आम्हाला संसार करायला शिकवणार का, असा संतप्त सवाल करीत नगरसेविकांनी आयुक्तांच्या डायसच्या दिशेने धाव घेऊन त्यांच्यावर बांगड्या भिरकावल्या. काही नगरसेवकांनीदेखील महिलांना आक्रमक होण्यासाठी पाठबळ दिले. आयुक्तांनी महिला नगरसेविकांची माफी मागावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेविकांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारात तासभर आंदोलन करून आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर अँटी चेंबरच्या बाहेरही आयुक्तांना बांगड्या दाखविल्या. आयुक्त संतापले... महापौर रडल्या आयुक्त महाजन हे सभागृहातील महापौरांच्या चेंबरमध्ये होते. भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी दिलगिरी व्यक्त करा, असे त्यांना सांगत होते. मात्र, आयुक्तांनी त्यास नकार दिला. आयुक्त म्हणाले की, मी पण नागरिक आहे. मलाही बोलण्याचा अधिकार आहे. मी काहीही अवमानास्पद बोललेलो नाही. वेळप्रसंगी राजीनामा देऊन टाकीन. मात्र, माफी मागणार नाही. आयुक्तांनी अशी भूमिका घेतल्यामुळे सभागृहात व बाहेर वातावरण तापत गेले. हा सगळा सावळागोंधळ पाहून महापौर कला ओझा यांना अश्रू आवरता आले नाहीत. डी.पी. कुलकर्णी यांना पदोन्नती देण्याचा आणि क्रांतीचौक येथील जागेवरील आरक्षण उठविण्याचा ठराव रद्द करण्याचे आदेश महापौरांना पक्षनेत्यांनी दिले होते. सभेत गदारोळ झाल्यामुळे मुद्दामहून सर्व काही घडल्याचा आरोप होण्याच्या भीतीने त्यांना रडू कोसळले. भाजपाच्या नगरसेवकांनी धीर दिल्यानंतर त्या सावरल्या. वातावरण शांत करण्यासाठी भाजपा नगरसेवकांची मोठी दमछाक झाली. सेनेचे नगरसेवक सभागृहातून निघून गेले होते.
महापालिका आयुक्तांना बांगड्यांचा अहेर!
By admin | Updated: December 21, 2014 00:18 IST