औरंगाबाद : प्रशासनाकडून विकास कामांना मंजुरी मिळत नसल्यामुळे शनिवारी दुपारी महानगरपालिकेत उद्रेक झाला. आयुक्त पी.एम. महाजन आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये हमरी- तुमरी झाली. यावेळी नगरसेवकांनी अर्वाच्य भाषा वापरली. घडलेल्या प्रकाराबद्दल आयुक्तांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हा प्रकार घडला तेव्हा आयुक्तांच्या दालनामध्ये विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, काँग्रेसचे गटनेते मीर हिदायत अली, राष्ट्रवादीचे नगरसेवक काशीनाथ कोकाटे, प्रमोद राठोड, अमित भुईगळ, रूपचंद राठोड, नगरसेवक विजेंद्र जाधव, शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपअभियंता एस.पी.खन्ना यांची उपस्थिती होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भारिप, अपक्ष नगरसेवक आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. नगरसेवक संजय केणेकरदेखील उपस्थित होते. ते गेल्यानंतर राठोड यांनी आयुक्तांना ज्या संचिका मंजूर आहेत, ती कामे सुरू करण्याची मागणी केली. आयुक्तांनी त्यावर धोरण ठरवून निर्णय घेऊ, असे सांगितले. तेवढ्यात भुईगळ म्हणाले, तुम्ही कुणाचाही फोन घेत नाही. धोरण ठरविण्यासाठी तुम्ही मनपात कधी येता? यावर आयुक्त म्हणाले, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आहेत, त्यांना संपर्क केला पाहिजे. मी पालिका डोक्यावर घेऊन फिरत नाही. मी काय मूर्ख आहे काय, आयुक्तांचे हे शब्द ऐकल्यानंतर भुईगळ संतापले. आयुक्त म्हणाले, मी काही तुमचा सालदार नाही. या वादातूनच अर्वाच्य भाषेत दालनातील वातावरण तापत गेले. मीर हिदायत अली, कोकाटे, पानझडे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.
महानगरपालिका आयुक्त, नगरसेवकांत हमरी-तुमरी
By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST