औरंगाबाद : राज्याबाहेरील व दूरस्थ शिक्षणाने एम.फिल. पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी विद्यापीठाकडे प्रवेश अर्ज सादर केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पदवीविषयी साशंकता निर्माण झाल्याने विद्यापीठाने त्यांचे प्रवेश रोखून धरले असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जानेवारी महिन्यात पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट) अर्ज मागविले होते. सुमारे साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे नोंदणी केली. एम.फिल. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षेतून सूट आहे. त्यांना थेट पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. त्यामुळे एम.फिल. झालेल्या विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्रवेशासाठी विद्यापीठाकडे अर्ज सादर केलेले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी अलगप्पा विद्यापीठ, मदुराई- कामराज विद्यापीठ, ग्लोबल विद्यापीठ- नागालँड, विनायका विद्यापीठ, अशा विद्यापीठांतून दूरस्थ शिक्षण पद्धतीने एम.फिल. केल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी आपली पदवीही विद्यापीठास सादर केली आहे. अलगप्पा विद्यापीठाने सन २००६ पासून एम.फिल.चा दूरस्थ अभ्यासक्रम बंद केलेला आहे. त्याविषयीचे पत्र अलगप्पा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पाठविले आहे. एम.फिल.चा दूरस्थ अभ्यासक्रम बंद केल्याचे अलगप्पा विद्यापीठ म्हणत असेल, तर विद्यार्थ्याने पदवी कशी प्राप्त केली. हा संशोधनाचा विषय आहे. काही विद्यार्थ्यांनी युक्तिवाद करताना एम.फिल.साठी २००६ पूर्वी प्रवेश घेतला होता, असे विद्यापीठाला सांगितले. याविषयी महाविद्यालय आणि विद्यापीठ मंडळ (बीसीयूडी)चे संचालक डॉ. एस.पी. झांबरे म्हणाले की, दूरस्थ शिक्षणाने राज्याबाहेरील विद्यापीठातून एम.फिल. केलेल्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी. प्रवेश सध्या आम्ही बाजूला ठेवलेले आहेत. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
राज्याबाहेरील एम.फिल. केलेल्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी. प्रवेश रोखले
By admin | Updated: May 13, 2014 00:58 IST