जालना : गेल्या ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेची परिवर्तन चळवळ सर्वसमावेशक असून शहराच्या या उपक्रमाची दखल राज्यात अनेक जिल्ह्यांनी देखील घेतली, अशी माहिती व्याख्यानमाला २०१५ चे अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी दिली.डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेस शहरात ८ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष म्हणून आ. अर्जुन खोतकर यांची निवड करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध विचारवंतांची मांदियाळी श्रोत्यांना मिळणार आहे. राज्य शासनाचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.निकाळजे म्हणाले, व्याख्यानमाला संयोजन समितीतर्फे दरवर्षी विविध जाती, धर्मातील व्यक्तींना या उपक्रमात सामावून घेतले जाते. डॉ. आंबेडकरांना जी समाजरचना अभिप्रेत होती, तोच विचार घेऊन व्याख्यानमालेचे कार्य अविरत सुरू आहे. ३८ वर्ष झाले, परंतु अद्याप व्याख्यानमालेस स्वत:ची इमारत उभी करण्यासाठी शासनाकडून जागा मिळाली नसल्याची खंत व्यक्त करून निकाळजे म्हणाले, आतापर्यंत लोकशाही अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी आपणास मिळालेली आहे. आपसात वर्गणी जमवूनच संयोजन समितीने हे सर्व उपक्रम राबविले, असेही निकाळजे म्हणाले. अनेक ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकारामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. ही परंपरा अखंडितपणे सुरू राहिल, असा दृढ विश्वास व्याख्यानमालेचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
व्याख्यानमालेची चळवळ सर्वसमावेश
By admin | Updated: April 8, 2015 00:49 IST