उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षी चोरट्यांनी धुमाकूळ घालत सर्वसामान्यांची झोप उडविली आहे़ या चोऱ्यांचा तपास गुलदस्त्यात असताना आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे़ मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना पूर्णत: अपयश आले आहे़ मात्र, वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी प्रत्येक बाजारात शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत वाहतूक सुरळीत केल्याचा दावा बिनधास्त ठोकत असल्याने शेतकरी वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे़उस्मानाबाद शहरात रविवारी आठवडी बाजार भरतो़ आठवडी बाजारात उस्मानाबाद तालुका व परिसरातील अनेक शेतकरी, व्यापारी येतात़ मात्र, मागील काही महिन्यांपासून आठवडी बाजारात जाताना अनेकांच्या काळजाचा ठेका चुकत आहे़ मोबाईल चोरांसह भुरट्या चोरट्यांनी आठवडी बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ प्रत्येक आठवडी बाजारात किमान दहा ते बारा जणांचे मोबाईल चोरीस जातात़ तर अनेकांच्या खिशाला कात्री लागते़ यातील काहीजण पोलिसांकडे तक्रार अर्ज देतात़ मोबाईल वापस मिळणार नाही, याची खात्री असली तरी पुढील अडचणी नकोत व तोच मोबाईल क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात़ आज झालेल्या रविवारीच्या आठवडी बाजारातही जवळपास दहा ते बारा जणांचे मोबाईल चोरीस गेले आहेत़ यातील काही जणांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ एकीकडे चोरट्यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम आठवडी बाजाराच्या मुहूर्तावर सुरूच ठेवले असले तरी शहर ठाण्यात अपुरे कर्मचारी असल्याने चोरटे हाती लागत नसल्याचे तुणतुणे कायम आहे़एकीकडे जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा निर्माण झाली आहे तर दुसरीकडे राबराब राबून मोठ्या कष्टाने पिकविलेले माळवे, धान्य उस्मानाबादच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी अनेक शेतकरी घेऊन येतात़ मावळं, धान्य विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या संसाराचा गाडा चालणार असतो़ मात्र, काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर होणाऱ्या गर्दीमुळे व्यवसायवर परिणाम पडत असल्याचे सांगत पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडत असल्याचे शेतकरी सांगतात़ तर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे सांगत चक्क शेतकऱ्यांचे तराजू घेऊनच तेथून निघून जातात़ त्यामुळे या शेतकऱ्यांनी आणलेले धान्य, माळवं विकायचे कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे बोलणे साहेबांच्या वरच्या थाटात असते, त्यामुळे गरीब शेतकरीही मन मारून तेथून निघून जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे़ (प्रतिनिधी)आठवडी बाजारात पोलिस नाहीत !गत अनेक महिन्यांपासून मोबाईल चोरट्यांसह खिसे कापणाऱ्या चोरट्यांनी आठवडी बाजारात धुमाकूळ घातला आहे़ शेकडो तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात येवून पडले आहेत़ याची माहिती असतानाही एकही पोलिस कर्मचारी आठवडी बाजारात तैनात नसतो़ वाहतूक सुरळीत करण्यासाठी असलेले कर्मचारी ‘शेतकऱ्यांना सुरळीत’ करण्याच्या कामातच मग्न असतात़ त्यामुळे चोरट्यांना सुरळीत करून मुस्क्या अवळणार कोण हे सर्वसामान्यांना पडलेले कोडे न सुटणारे आहे़यांचे मोबाईल लंपासरविवारच्या आठवडी बाजारात ओमप्रकाश कुंभार (बेंबळी), गणेश राऊत (येडशी), राजू भावलकर (तुळजापूर), नागनाथ कुंभार, सुरेश वाघमारे (उस्मानाबाद) या पाच जणांसह जवळपास दहा ते बारा जणांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केले आहेत़
मोबाईल चोरट्यांचा बाजारात धुमाकूळ
By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST