- विशाल सोनटक्केऔरंगाबाद : आधुनिक काळात ताण-तणाव वाढल्यानेच आरोग्याचे प्रश्न जटिल झालेत. अशा स्थितीत रुग्णाला एकाग्रतेच्या माध्यमातून मन:शांती मिळवून देण्याची गरज आहे. हे काम ध्यानधारणा प्रभावीपणे करते. त्यामुळे अनेक आजारांसाठी रुग्णांना मी मेडिसीनऐवजी मेडिटेशन लिहून देतो. ध्यानधारणा हे आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग असल्याचे डॉ. प्रमाहा केराती (थायलंड) यांनी सांगितले.जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने शुक्रवारी ‘आयएमए’च्या सभागृहात डॉ. प्रमाहा केराती यांनी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रमाहा थिरस्वत, डॉ. पांगपट यांच्यासह आरोग्य विभागाचे सहा. संचालक डॉ. जी. एम. गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, सचिव डॉ. यशवंत गाडे, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सावजी, कैलास झिने, डॉ. रेखा गायकवाड, प्रा. ज्योती गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. प्रमाहा केराती यांचे वैद्यकीय शिक्षण अमेरिकेत झाले असून, एंडोक्रायनोलॉजी सुपर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते थायलंड येथे भिक्खूंना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. याबरोबरच थायलंडमधील रुग्णालयात ध्यानधारणेचे प्रशिक्षणही देतात. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. केराती यांनी आपला डॉक्टर ते भिक्खू हा प्रवास कसा झाला याची माहिती दिली. कुटुंबातील बहुतांश सदस्य वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे मीही वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो. मात्र कालांतराने माझी एका बौद्ध धम्मगुरूशी ओळख झाली आणि त्याद्वारे ध्यानधारणा पद्धतीचे आकर्षण वाढले. ध्यानधारणेचा सखोल अभ्यास केल्यानंतर ही पद्धती अनेकांचे जगणे सुखकर आणि आनंददायी करू शकते याची जाणीव झाल्याने ही पद्धती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले.जगण्यातला आनंद वाढला पाहिजे. तो ध्यानधारणेच्या माध्यमातूनच वाढू शकतो यावर दृढविश्वास असल्याचे ते म्हणाले. मागील काही वर्षात रक्तदाब, मधुमेह तसेच मेंदूच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. मानसिक तणाव हे याचे प्रमुख कारण आहे. ध्यानधारणेमुळे एकाग्रता वाढते. ध्यानाचा खरा अर्थ स्वत:च्या अस्तित्वाचा खोलवर जाऊन विचार करणे, हे प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ध्यानधारणेमुळे मन प्रसन्न राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. माणूस आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायला लागतो. आजार, वेदना कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
'आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग ध्यानधारणा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 01:28 IST