अंबाजोगाई: शहरातील नागरिकांना टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योगेश्वरी देवस्थानतर्फे विविध प्रभागात विंधन विहिरी देण्यात आल्या. सदर बाजारमधील पंचशील नगर परिसरात विंधन विहीर घेण्यात आली. ही विहीर नागरिकांसाठी तात्काळ खुली करावी म्हणून जनवादी महिला संघटनेतर्फे तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.शहरातील पंचशील नगर येथे योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी विंधन विहीर घेण्यात आली. या विंधन विहिरीस मोठ्या प्रमाणावर पाणी लागले. त्यानंतरही ती विंधन विहीर किरकोळ कारणास्तव सुरु करण्यात आली नव्हती. नागरिकांना पाण्यासाठी बोअर उशाला अन् कोरड घशाला अशी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे कॉ. उषा बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली जनवादी महिला संघटनेच्या वतीने अंबाजोगाई तहसीलमध्ये अंदाजे पन्नासहून अधिक महिलांनी एकत्र येत तहसीलदार राहुल पाटील यांना या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी घेराव घातला. हा घेराव गुरुवारी घालण्यात आला. तब्बल दीड तास जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.यावेळी तहसीलदार राहुल पाटील यांनी या प्रश्नावर जनवादी महिला संघटनेच्या महिला भगिनींशी चर्चा करून पंचशील नगर येथे योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या विंधन विहिरीचा आवश्यक यंत्रसामुग्री त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी उषाताई पोटभरे, सविता वेडे, लक्ष्मीबाई गायकवाड, अनिता जिरंगे, शांताबाई, चिमण्या आदीसहित पन्नासहून अधिक महिलांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला.याबाबत तहसीलदार राहुल पाटील म्हणाले, महिलांनी दिलेल्या निवेदनावर आम्ही विचार करू. या विहिरीबाबत जो काही प्रश्न असेल तो तात्काळ मार्गी लावून विहीर खुली करण्यात येईल. जनवादी महिला संघटनेच्या वतीने निवेदनात दिलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, यावर नक्की तोडगा काढण्यात येईल. (वार्ताहर)
जनवादीने घातला तहसीलदारांना घेराव
By admin | Updated: July 8, 2014 00:55 IST