जालना : वीज वितरण कंपनीच्या सहा जिल्ह्यांसाठी जालन्यात असलेल्या पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड रुमला ८ जुलै रोजी लागलेल्या संशयित आग प्रकरणी विद्युत निरीक्षकांनी केलेल्या चौकशीअंती ही आग शॉटसर्किटमुळेच झाल्याचा दावा महावितरणच्या सूत्रांनी केला आहे. विशेष म्हणजे या आगीत वीज चोरीसंबंधीच्या अकराशे गुन्ह्यांची कागदपत्रे जळाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्य अभियंत्यांनीच व्यक्त केला होता. या रेकॉर्ड रूममध्ये महावितरणच्या वसूली पथकांनी जप्त केलेले मीटर्स, वायर इत्यादी माल ठेवलेला होता. तसेच एक रॅक व कपाटामध्ये वीज चोरीसंबंधी सदरील पोलिस ठाणे स्थापनेपासून दाखल असलेल्या एफआयआर ची कागदपत्रे होती. आगीमध्ये ही कागदपत्रे जळाली. मात्र मीटर्स, वायरचा माल सुरक्षित राहिला. या संशयित आगीबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ च्या १० जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने यासंबंधीचा अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांकडून मागवून घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या आगीची चौकशी करण्यात येत असल्याचे जालना दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.दरम्यान, विद्युत निरीक्षकांनी आपल्या चौकशी अहवालात या ठाण्याच्या इमारतीमधील विद्युत जोडणी व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.सुमारे दीड महिन्यांपूर्वी हा अहवाल सादर होऊनही अद्याप ही जोडणी बदलण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)सदरील पोलिस ठाणे जालन्यासह औरंगाबाद, परभणी, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी आहे. ठाण्याची स्थापना होऊन आठ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे या कालावधीतील पोलिसांशी संबंधित सर्व रेकॉर्ड याच रुममध्ये ठेवण्यात आलेले होते. परंतु यामधील ११०० गुन्ह्यांच्या संचिका जळाल्यामुळे त्या प्रकरणांच्या तपासाचे काय? याविषयी महावितरणकडून दीड महिन्यानंतरही कुठलाही खुलासा झालेला नाही.
महावितरण ठाण्यातील आग शॉटसर्किटमुळेच
By admin | Updated: September 17, 2014 01:11 IST