औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज सायंकाळी नागपूर सुधार न्यासच्या (नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) सभापतीपदी बदली झाली आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तपदी धुळ्याचे जिल्हाधिकारी पी. एम. महाजन यांची बदली झाली आहे. महाजन हे चार वर्षांपासून धुळे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून २ किंवा ३ सप्टेंबर रोजी ते मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतील. महाजन यांच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प धुळ्यात राबविला गेला. साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे तो प्रकल्प आहे. कॉपीमुक्त परीक्षा आणि जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. एक खमक्या प्रशासक म्हणून त्यांनी जिल्हाधिकारीपदावर काम करताना प्रतिमा निर्माण केली. ७ फेबु्रवारी २०१३ रोजी डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मनपा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीचे नेते खा. चंद्रकांत खैरे आणि आयुक्तांमध्ये २३ आॅगस्टपर्यंत सलोख्याचे वातावरण नव्हतेच. असे असतानाही आयुक्तांनी अॅप्रोच चॅनलसाठी साडेआठ कोटी, ५० कोटींचे रस्ते, भूमिगत गटार योजनेसाठी ४६५ कोटी, तीन वर्षांपासून रखडलेली ७९२ कोटींची समांतर जलवाहिनीची योजना मार्गी लावण्यासाठी काम केले.
मनपा आयुक्तपदी महाजन
By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST