लातूर : लातूर जिल्ह्यात ७८७ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या हजार ते बाराशे लोकप्रतिनिधींकडे शौचालय नाहीत़ जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शौचालय बांधण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना, ग्रा़प़ंसदस्यांकडे शौचालयाचा अभाव आहे़ तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांनी शौचालय बांधण्यासाठी मुदतवाढ दिली होती़ या मुदतवाढीत काही सदस्यांनी शौचालय बांधली. परंतु, काहींनी अद्याप त्याकडे कानाडोळा केला आहे़ विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाऱ्या ग्रामसेवकांनी पाठपुरावा केला नसल्यामुळे ग्रा़पं़सदस्यांची शौचालये पूर्ण झाली नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्यास शौचालय असण्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते़ शासनाने तशी अटच घातली होती़ परंतु मध्यंतरीच्या काळात ही अट शिथिल करण्यात आली़ निवडणुकीनंतर तीन-चार महिन्यात शौचालय बांधावे अशी अट घातली़ त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत असलेल्या उमेदवारांनी शौचालय न बांधता उमेदवारी ठेवली़ त्यातील काही निवडुनही आले़ बराच कालावधी होऊनही अनेकांनी शौचालय बांधली नाहीत़ जवळपास जिल्ह्यात १२०० ग्रा़प़ं सदस्यांकडे अद्यापही शौचालय नाहीत़ लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांच्यापुढे शौचालय नसणाऱ्या ग्रा़पं़ सदस्यांची सुनावणी झाली़ त्यावेळी तात्काळ शौचालय बांधा अन्यथा आपले सदस्यत्व अपात्र ठरविले जाईल, असे निर्देश दिले होते़ त्यावेळी काही सदस्यांनी शौचालय बांधली़ परंतु काहींनी या निर्देशाकडे दुर्लक्ष केले़ जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतीमध्ये किमान एक-दोन सदस्यांकडे शौचालय नाहीत़ जरी असले तरी त्याचा वापर नाही़ सध्या लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यात १५८, जळकोट तालुक्यातील ११, अहमदपूर तालुक्यातील ८८, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील १९, जळकोट तालुक्यात २७, निलंगा तालुक्यात १२, देवणी तालुक्यात ७, चाकूर तालुक्यात ७, औसा तालुक्यात ९ व उदगीर तालुक्यात १७ ग्रा़प़ं सदस्यांकडे शौचालय नसल्याची माहिती स्वच्छता विभागाकडे आहे़ (प्रतिनिधी)शौचालय नसलेल्या ग्रा़पं. सदस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार होती़ परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सुनावणी झाली नाही़ आता जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग ज्या सदस्यांकडे शौचालय नाही, त्याची माहिती घेत आहे़ ही माहिती पूर्ण आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़ ग्रामसेवकांकडे ज्यांच्याकडे शौचालय नाही याची माहिती असते़ परंतु त्याची माहिती गट विकास अधिकाऱ्यांकडे येत नाही़ गट विकास अधिकारीही ही माहिती घेण्यास उशीर करतात़ त्यामुळेही ग्रा़प़ं सदस्यांकडे शौचालयाचा अभाव आहे़ लातूर जिल्ह्यात यंदा ३६००० शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते़ मात्र हे उद्दिष्टही साध्य करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे़ केवळ ८७१४ शौचालय बांधण्यात आली आहेत़ ५० टक्केही उद्दिष्ट प्राप्ती झाली नाही़ शौचालय बांधण्याचा नुसताच गाजावाजा प्रशासन करीत आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्यांनीही शौचालये बांधली नाहीत.
लोकप्रतिनिधींकडेच शौचालयांचा अभाव !
By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST