मोहन बोराडे, सेलूनगरपालिकेने महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा उभारली मात्र उद्घाटनानंतर या व्यायामशाळेला ट्रेनर अभावी कुलूप आहे़ शहराच्या मध्यवर्ती नगरपालिका स्टेडियम परिसरात नव्याने बांधकाम करून महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा नगर पालिकेने वर्षभरापूर्वी उभारली़ मात्र खाजगी तत्वावर व्यायामशाळा सुरू करण्यासाठी कोणीही येत नसल्यामुळे शाळेचे कुलूप उघडलेले नाही़ सेलू शहरात युवकांसाठी खाजगी व्यायामशाळा सुरू आहेत़ महिलांना व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळा असावी, या उद्देशाने ऩप़ने २०१३ मध्ये इमारतीचे काम पुर्ण करून अद्यावत व्यायामाच्या साहित्यासह व्यायामशाळा उभारली़ २७ जून २०१३ रोजी या व्यायामशाळेचे मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते उदघाटनही झाल़े परंतू, व्यायामशाळा चालविण्यासाठी एकही महिलासमोर आली नाही़ परिणामी व्यायामशाळा उदघाटनापासूनच बंदच आहे़ स्टेडियम परिसरात जवळपास १५ लाख रूपये खर्च करून एक हॉल, शौचालय, बाथरूम आदी सुविधां असलेली ही व्यायामशाळा उभारण्यात आली आहे़ या व्यायामशाळेत विविध प्रकारच्या अद्यावत मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत़ परंतु, ऩप़ने अनेकवेळा प्रयत्न करूनही व्यायामशाळा चालविण्यासाठी महिला पुढाकार घेत नसल्यामुळे सर्व साहित्य धुळखात पडून आहे़ शहरातील महिला वॉकिंगसाठी परतूर, परभणी, पाथरी रोडवर येतात़ तसेच सकाळच्या वेळी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरही महिलांची वर्दळ असते़ परंतू पालिकेने अद्यावत महिला व्यायामशाळा उभारूनही केवळ ट्रेनर व खाजगी तत्वावर चालविण्यासाठी कंत्राट घेण्यास कोणीही तयार होत नसल्यामुळे लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या महिला व्यायामशाळेला कुलूपच असल्याचे चित्र पाहवयास मिळते़ विशेष करून शहराच्या मध्यभागी व सुरक्षित ठिकाणी व्यायामशाळा असतानाही महिलांनी याकडे पाठ फिरवली आहे़
महिला व्यायाम शाळेला कुलूप
By admin | Updated: August 26, 2014 23:54 IST