जालना : शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला तीन वर्षांपासून कुलूप आहे. एकही अधिकारी या कार्यालयात पाय ठेवण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यानंतर कोणीच जिल्ह्याच्या प्रशासनावर पकड बसवू शकला नाही. पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना तर ही मंडळी अजिबात जुमानत नसल्याचे चित्र आहे. बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राजपूत यांनी सांगितले, जालना येथे गुंडांचा त्रास होत असल्याने आपण कार्यालयात थांबत नाही. पोलिसांकडून संरक्षण मिळत नाही. चौकीत कोणीच थांबत नाही. कोट्यवधी रूपयांची देयके अदा करतांना संचिकाच शासनाच्या नियमाप्रमाणे चालत नसल्याने या कार्यालयाचा कारभार पार खाजगीच्या पलिकडे झाला आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक, कारकून ही मंडळीही कार्यालयात थांबत नाही. त्यामुळे हे शासकीय कार्यालये केवळ शोभेची वस्तू बनली की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विकास कामांना सुरूवात करताना अभियंत्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. पाहणी होऊन गुणवत्ता तपासली जाण्याची गरज आहे. मात्र असे काहीच होत नसल्याच्या तक्रारी आहे. गुणवत्ता विभागाकडून मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार कामांची तपासणी करण्यात आली तर हे प्रमाणपत्रच बोगस असल्याचे दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे. या कार्यालयाचा कारभार इतका अजब झाला आहे की, कार्यकारी अभियंता यांनी एक जाधव नावाचा एजंट नेमला आहे. त्याच्यामार्फत गेलेली संचिकेचेच धनादेश अदा केले जातात. उर्वरित कामांची देयके अदा केली जात नाही. (प्रतिनिधी)
बांधकाम खात्याच्या कार्यालयाला कुलूप!
By admin | Updated: July 7, 2014 00:15 IST