नांदेड : पोळ्यापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे़ दीर्घकाळाने आलेल्या पावसामुळे जमिनीची भूक भागण्यास वेळ लागत आहे़ चार दिवसांच्या पावसाने अनेक नदी- नाल्यांतून पाणी वाहत आहे़ मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापर्यंत भरलेले नाहीत़ या पावसाने बळीराजा सुखावला असला तरी मोठा पाऊस व्हावा, अशी अपेक्षा सर्वांनाच लागली आहे़ कंधार : पावसाळ्यातील अनेक नक्षत्रे झाली़ परंतु निसर्गाची वक्रदृष्टी चिंतेची झाली होती़ ग्रामीण भागात पोळा सण संपल्यानंतर पाऊस तुरळक होतो़ असे शेतकरी सर्रास गृहीत धरतो़ याला छेद देत पोळा सणापासून संततधार पावसाची हजेरी खरीप पिकांना संजीवनी ठरत आहे़ आणि 'पोळा, पाऊस झाला गोळा' अशी चर्चा होत आहे़यावर्षी पावसाअभावी शेतकरी, नागरिक व पशुधनाची पुरती गोची झाली़ पेरणीपुरता पाऊस झाला नाही़ एका गावावर पावसाची हजेरी तर शिवारात गैरहजेरी अशा विचित्र अवस्थेत शेतकरी सापडला होता़ पेरणीला हजेरी तर पुन्हा उघडीप असे भयावह चित्र निर्माण झाले़ पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या, चारा नसल्याने पशुधनाला जगविण्यासाठी जिवापाड मेहनत करण्याचा प्रसंग पशुपालकांवर ओढवला़कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून मागणी होऊ लागली़ यालासुद्धा कारणे होती़ चाऱ्याअभावी पशुधनाचा प्रश्न गंभीर झाला़ शेतकऱ्यांवर पोळा सण साजरा करण्याची शक्ती क्षीण झाली़ साधेपणाने सण साजरा करण्यात आला़ पोळा सणानंतर पाऊस दुर्मिळ होणार त्यामुळे पिण्याचा पाणी व चारा प्रश्न भयावह होणार, अशी चर्चा झडत होती़ त्याला निसर्गाने छेद दिला़पोळा सणादिवशी पावसाने हजेरी लावली़ दररोज हलका पाऊस पडू लागला़ २९ आॅगस्ट रोजी सर्वदूर पाऊस झाला़ कंधार ३४ मि़ मी़, फूलवळ २८, कुरुळा ३४, पेठवडज १०, बारूळ २७ व उस्माननगर ५ असा तालुक्यात सरासरी २३ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ एकूण आतापर्यंत झालेला पाऊस २३६़३ मि़मी़ नोंद झाली़ ३० आॅगस्ट रोजी सकाळपासूनच संततधार कधी जोराचा अशी पावसाची हजेरी होती़ सायंकाळपर्यंत असेच चित्र होते़ निवघा बाजार : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवघा बा़ परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून पिकांना जीवदान मिळाले आहे़प्रथमच झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील नदी-नाले भरून वाहू लागले तर कयाधू नदी दुथडी वाहत आहे़ शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी २ वाजेपर्यंत सुरूच होता़ येथील पर्जन्यमापक यंत्रात ३० आॅगस्ट रोजी ४ मि़मी़त र ३१ रोजी ३३ मि़मी़ पावसाची नोंद झाल्याची माहिती तलाठी कोथळकर यांनी दिली़ परिसरात दोन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले, गाव, तलाव तुडुंब भरले आहेत़ तर विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली आहे़ दोन दिवस झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे़ मुसळधार पावसाने रस्त्यावरील केरकचरा वाहून गेल्याने रस्ते चकाचक झाले आहेत़अर्जापूर : गत चार दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले़ यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने व जवळपास अडीच महिन्यात मोठा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली़ परिणामी मूग, सोयाबीन, उडीद व इतर पिकांचे नुकसान झाले़ यावर्षी शेतकरी बांधव दुबार - तिबार पेरणी करून चिंतेत आहेत़ सोयाबीन पिकाला कीड लागून खराब होत असल्याचे शेतकरी सायन्ना पोरडवार यांनी सांगितले़ मांडवी : दोन दिवसांपासून चालू असलेल्या जोरदार पावसाने शेतातून पाणी बाहेर निघाले असून नदी-नाले वाहते झाले आहे़शेतकऱ्यांच्या बैलपोळा या सणापासून या भागात पावसाने चांगली सुरुवात केली़ गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या पावसाने सर्व बाजूने पाणीच पाणी झाले आहे़ मांडवी (पाटोदा), सिरपूर, दरसांगवी या प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली़ शेत शिवारातून पाणी निघाले, नदी नाले वाहते झाले़ आता रासायनिक खताची मात्र देणे, किटकनाशकाची फवारणी, निंदणी, खुरपणी इ़ कामे पुढे आली आहेत़ शेतकरी काहीसा सुखावला आहे़ नायगाव बाजार : दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून पिकांना जीवदान मिळाले आहे़गतवर्षीसारखा पाऊस पडेल व पेरण्या वेळेवर लागतील म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून बाजारपेठेतून महागडे बियाणे व खते खरेदी करून पावसाची प्रतीक्षा करीत होते़ जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही़ जुलैमध्ये काही भागात पाऊस झाला, त्यावरच बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि अधूनमधून रिमझिम पाऊस झाला़ आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली़ त्यामुळे शेतातील पिके कोमेजू लागली होती़ नदी, विहीर व बोअर पाण्याअभावी बंद पडल्याने जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता़ बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले पशुधन देखील विक्रीस काढले़ पावसाअभावी चोहीकडे हाहाकार होत असतानाच चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली़ यामुळे नदी नाल्यांना पूर आला व पिकांनाही जीवदान मिळाले़ २६ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट या कालावधीत १६१ मि़मी़ पाऊस झाल्याची नोंद झाली असून एकूण ३३० मि़मी़ पाऊस झाला़ मनाठा : तालुक्यातील सहा मोठे तलाव अत्यल्प साठ्यावर येऊन ठेपले होते़ परंतु दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे या सहाही तलावात पाणीसाठा वाढला आहे़ यामुळे प्राण्याचा पाणीप्रश्न सध्या तरी सुटला आहेग़ेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती़ पिकासाठी भीज पाऊस होत होता़ परंतु मोठा पाऊस एकही झाला नव्हता़ त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी जंगलातील तलावातही नव्हते़ पोळ्याच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली़ ३० व ३१ आॅगस्ट रोजी संततधार पाऊस सुरू असल्याने ओढेनाले तुडुंब भरून वाहू लागले़तालुक्यात केदारनाथ, खामगाव, सावरगाव, कवना, चाभरा, माळझरा, पिंगळी, मनाठा, गायतोंड आदी तलावात २५ टक्के पाणीवाढ झाली आहे़ या तलावात मोठ्या प्रमाणात मच्छीमार व्यवसाय सुरू असतो़ पहिल्या पावसात नवीन बीज आणून सोडले जाते़ लाखो रुपयांची उलाढाल मच्छीमार संस्था करीत असतात़ पाणी न पडल्यामुळे त्याचे आर्थिक संकट वाढले होते़ परंतु या पावसामुळे या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत़ नरसीफाटा : पोळा सणाच्या दिवसापासून नायगाव तालुक्यात काही भागात मोठा पाऊस पडल्याने पिकांना जीवदान मिळाले़ तेव्हापासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यात आजपर्यंत ३३० मि़मी़ पावसाची नोंद झाली़पावसाळ्यात मोठा पाऊस पडला नसल्याने नरसीतांडा, धुप्पा, गोदमगाव येथे तीव्र पाणीटंचाई होती़ त्यामुळे येथे तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता़ पण सलग सहा दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे़ परिणामी गावातील पाणीप्रश्न सुटल्याने हे तीन टँकर दोन दिवसापूर्वी बंद करण्यात आले़ ३० रोजी तालुक्यात ५२ मि़मी़ पऊस पडला़ काल झालेल्या पावसाचा जोर मोठा होता, त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरू वाहत आहेत़ (वार्ताहर)भोकर तालुक्यात संततधार हजेरीभोकर : मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने ३० आॅगस्टच्या रात्रीपासून पावसाने आळस झटकत संततधार हजेरी लावली़ यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे़ यावर्षी पावसाच्या सरीत जोर नव्हता़ यामुळे नदी-नाले कोरडे तर तलाव तळ गाठले होते़ मागील तीन दिवसांपासून तालुक्यात पावसाच्या हलक्याशा सरी येत-जात होत्या़ पण ३० आॅगस्टच्या रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली़ यामुळे सुधा प्रकल्पासह अन्य लघू तलावांत पाणी आता जमा होवू लागले आहे़ सुधा प्रकल्पात ३१ आॅगस्ट सकाळपर्यंत ३८ टक्के पाणी जमा झाले होते़ दिवसभर पडणाऱ्या संततधारमुळे या प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी जमा होण्याची शक्यता आहे़ सदरील संततधार पावसाने शेतकरी सुखावला असून चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे, तर बाजारपेठ ठप्प पडली आहे़ या पावसामुळे पाणीप्रश्न मिटण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांनाही दिलासा देणारा पाऊस आहे़ दरम्यान, सुधा नदीवरील पुलावरून पडून एकाचा मृत्यू झाला़ दिवशी खु़ येथील कैलास भीमराव जोगदंड (वय ३५) हे पुलावरून जात असताना त्यांचा तोल जावून नदीतील पाण्यात पडून मृत्यू झाला़ किनवट तालुक्यात दमदार पाऊसकिनवट : तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती कायम असतानाच गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे़ खरीप पिकांची वाढ म्हणावी, तशी नसली तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळणार आहे़ खरीप हंगामावर पावसाअभावी गंडांतर आले आहे़ उत्पादनक्षमता मोठी घटणार आहे़ या पावसाने मात्र पहिल्यांदाच तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला़ कोरड्या प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा साठल्याचे दिसून येते़ तालुक्यात ३१ आॅगस्टपर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत ४५ मि़मी़ इतकी नोंद झाली़ रविवारी पावसाचा जोर कायमच होता़ पावसाळ्याच्या आरंभापासूनच पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आले होते़ खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या़ शेतकऱ्यांना एकदा नव्हे, दोनदा, तिसऱ्यांदा खरीप पेरणी करावी लागली़ याही पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत़ ज्या पेरण्या यशस्वी झाल्या, त्या पेरण्याही पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली होती़ यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्ऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार हे निश्चित मानले जात असताना जून, जुलै व आॅगस्ट कोरडाच जाण्यावर असताना आॅगस्टच्या शेवटी शेवटी दमदार पाऊस बरसून नदी, नाले वाहिले़ तलावही काही प्रमाणात भरले़ या पावसाने खालावलेली पाणीपातळी उंचावण्यास मदत होणार आहे़ ३० आॅगस्टच्या रात्री व ३१ आॅगस्टला सकाळपासूनच पावसाचा अधूनमधून जोर कायम होता़ ३१ आॅगस्ट रोजी सकाळपर्यंत ४५ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ गतवर्षी ३१ आॅगस्टपर्यंत १ हजार ७६ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद होती़ ती यावर्षी केवळ ३८० मि़मी़ इतकी झाली आहे़ आॅगस्टअखेर पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे हवालदिल शेतकरी तूर्ततरी सुखावला आहे़
पिकांना जीवदान; मोठ्या पावसाची अपेक्षा
By admin | Updated: September 1, 2014 00:25 IST