परभणी : मनपाअंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या लाभासाठी त्रुटीची पूर्तता केलेल्या १२१ लाभार्थ्यांची यादी मनपाने जाहीर केली आहे. आतापर्यंत ४५६ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिल्याचे मनपाने सूत्रांनी सांगितले.महानगरपालिकेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील रमाई घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यानिधीतून यापूर्वी ४५६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, निवड झालेल्या सर्वच लाभार्थ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. उपलब्ध निधीपैकी या योजनेवर ८ कोटी रुपये खर्च झाला आहे.योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता यावी, योग्य व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, दलालांमार्फत अडवणूक व आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून राज्यात सर्वप्रथम मनपाने निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर बांधकामाच्या टप्प्यानुसार आर.टी.जी.एस. प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले.त्यामुळे अनुदानाचा योग्य वापर करुन लाभार्थी सुंदर घरे बांधत आहेत. त्यामुळे परभणीच्या सौंदर्यात भर पडल्याचे मत महापौर प्रताप देशमुख यांनी व्यक्त केले. दारिद्र्य रेषेखालील त्रुटीमधील ज्या अर्जदारांनी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करुन दिली आहेत, अशा १२१ लाभार्थ्यांची निवड रमाई घरकुल योजनेसाठी केल आहे. उर्वरित त्रुटीमध्ये दारिद्र्य रेषेखालील घरकुलांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची यादी लवकरच प्रकाशित करण्यात येईल. ज्यांची घरकुल योजनेसाठी निवड झाली आहे, त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर बांधकामाच्या टप्प्यानुसार उपलब्ध करुन दिले जाणार असून, सद्यस्थितीत प्रथम टप्पा अनुदान प्रति लाभार्थी २० हजार याप्रमाणे २४ लाख २० हजार रुपये अनुदान निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले. यासाठी सभापती आशाताई वायवळ यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
१२१ घरकूल लाभार्थ्यांची यादी जाहीर
By admin | Updated: August 21, 2014 23:18 IST