लातूर : महावितरणच्या कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लातूर परिमंडळातील ३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांकडे मुळ थकबाकीपोटी ८०३ कोटी ५० लाख १४ हजार रुपयाची वीजबिले थकित आहेत़ या योजनेकडे ३ लाख ६३ हजार शेतकरी ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. कृषी ग्राहकांवरील वीजबिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषि संजीवनी योजना सुरु केली़ यामध्ये मुळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा पहिल्या टप्प्यात २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २० टक्के व तिसऱ्या टप्प्यात १० टक्के या प्रमाणात रक्कम भरुन थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरणकडून माफ करण्याचा निर्णय घेतला आहे़ आतापर्यंत लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी मुळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपयाचा भरणा केला़ यातून शेतकरी ग्राहकांचे ५८ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये एवढी रक्कम माफ करण्यात आले आहे. तर उर्वरीत ३ लाख ६३ हजार ग्राहकांनी दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने कृषी संजीवनी योजनेच्या थकबाकीकडे पाठ फिरविली आहे. कृषि संजीवनी योजनेच्या थकबाकीच्या भरण्यात ३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांकडे ८०३ कोटी ५० लाख १४ हजार रुपये थकित आहेत़ या एकूण रकमेपैकी या ग्राहकांना फक्त ४०१ कोटी रुपये थकित वीजबिलाचा भरणा करणे आवश्यक आहे़ हा भरणा पूर्ण केल्यानंतर एकूण मुळ थकबाकीपैकी लातूर परिमंडळाकडून ११५५ कोटी ५२ लाख ७७ हजार १९४ रुपये एवढे विजबील माफ होणार आहे़ (प्रतिनिधी)
साडेतीन लाख ग्राहकांची पाठ
By admin | Updated: February 16, 2015 00:52 IST