वाळूज महानगर : वाळूज महानगरातील सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सिडको प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. बजाजविहारच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला ग्रोथ सेंटर भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे जलवाहिनीपासून हाकेच्या अंतरावर सिडकोचे मुख्य कार्यालय आहे. तरीही प्रशासन या गळतीकडे लक्ष द्यायला तयार नाही. गळतीमुळे जलकुंभात पुरेसे पाणी साठवले जात नाही. त्यामुळे सिडको परिसरातील नागरिकांना कमी दाबाने आणि चार दिवसांआड पाणी मिळत आहे. सिडको ए, बी आणि सी-सेक्टर, सारा गौरव सोसायटी, सारा वृंदावन सोसायटी, साईनगर, गणेशनगर आदी वसाहतींमध्ये पाण्यासाठी ओरड सुरू आहे. नुकतेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडको कार्यालयाला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. यावेळी नागरिकांनी अनेक समस्यांचा पाढा भाटिया यांच्यापुढे वाचला होता. त्यामध्ये पाण्याची प्रमुख समस्या होती. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर भाटिया यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते. त्यांचे आदेश पाळणे तर दूरच; परंतु आहे त्या पाण्याचेही नियोजन सिडको प्रशासन व्यवस्थित करीत नसल्याचे या गळतीवरून दिसत आहे. वाळूज व आसपासच्या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पैसे देऊनही लोकांना पाणी मिळत नाही. सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला सुरू असलेल्या गळतीमुळे पाणी वाया जात आहे. गळती थांबविल्यास नागरिकांना काही प्रमाणात तरी पाणी मिळेल. अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरू असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वडगाव कोल्हाटीचे ग्रा.पं. सदस्य सतीश पाटील यांनी सांगितले.
सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला गळती
By admin | Updated: May 18, 2014 01:23 IST