मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरातील सुमारे १५ लाख नागरिक रात्री शांतपणे झोपू शकतात. कारण कायद्याचे संरक्षक त्यांच्यासाठी रात्रीही सेवेत असतात. मात्र, मागील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढताच कायद्याचे संरक्षकही त्रस्त झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत रात्री पेट्रोलिंग करावी तरी कशी, असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे. तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरही मिळालेले नाहीत.चार दिवसांपूर्वीच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या सुधारक गंथळे या कर्मचाऱ्याचा थंडीने गारठून मृत्यू झाला. या घटनेने राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना विचार मंथन करण्यास भाग पाडले आहे. रात्री चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत. व्यापारी, नागरिकांच्या मालमत्ता सुरक्षित राहाव्यात म्हणून पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल ओतून काम करीत असतात. पोलिसांच्या वारंवार गस्त, कडा पहारा लक्षात घेऊन अनेक गुन्हेगार पळ काढतात.खाकी वर्दीत वावरणारे पोलीस कर्मचारीही माणूसच आहेत, याचा विसर सत्ताधाऱ्यांना नेहमीच पडतो. कालपर्यंत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, पोलीस यंत्रणेच्या विविध प्रश्नांवर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे विरोधकच आज सत्तेत बसले आहेत. सत्तेच्या खुर्चीची ‘ऊब’ पाहून सत्ताधाऱ्यांना कालच्या प्रश्नांचा विसर पडला की काय, अशी शंका अनेकांना वाटत आहे.
कायद्याचे संरक्षक गारठ्याने त्रस्त! चार वर्षांपासून स्वेटरच मिळाले नाहीत
By admin | Updated: December 8, 2014 00:24 IST